बेपत्ता तरुणाची हत्या; पैशांसाठी ठार मारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुलुंड येथील बेपत्ता तरुणाचा भिवंडी येथे मृतदेह सापडला असून त्याची दोघांनी पैसे लुटण्याच्या उद्देशाने हत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्या एका मारेकऱ्याला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे.

प्रसाद मुलुंड येथे राहत होता तर दीपक संघवी यांच्या अरिहंत इंडस्ट्रीज नावाच्या प्लॅस्टिक रॉ मटेरियल सप्लायच्या कंपनीत काम करीत होता. त्याच्याकडे विविध व्यापाऱ्यांकडून पैसे जमा करून आणण्याची जबाबदारी होती. 6 मार्च रोजी तो नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून बाहेर गेला. पण त्यानंतर घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या बहिणीने प्रसाद हरविल्याची तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक प्रसादचा शोध घेत असताना भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह सापडला असून तो प्रसादचा असल्याचे समोर आले. त्यानंतर नारपोली पोलिसांनी प्रसादला मारणाऱ्या एका आरोपीला पकडले होते तर दुसरा आरोपी फरार होता. दुसरा आरोपी हा मुलुंड येथील घरी येणार असल्याचे खबर मिळताच मुलुंड पोलिसांनी त्याला पकडले.