मुख्यमंत्र्यांनी काकडेंना पटवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

भाजपचे पुण्यातील नाराज खासदार संजय काकडे यांचे मन वळवण्यात अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. संजय काकडे भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना पटवल्यामुळे त्यांची काँग्रेसवारी आता टळली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष डॉ. भारती पवार आणि मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी संजय काकडेही व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, स्थानिक कारणांमुळे संजय काकडे नाराज होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसशी संपर्क केला होता. मात्र त्यांची आणि माझी भेट झाली. तेव्हा मी त्यांना सांगितले की, स्थानिक गोष्टी स्थानिक पातळीवरच सोडवल्या पाहिजेत. तेव्हा त्यांना हे पटले. त्यांनी आता भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. काकडे यांच्यावर आम्ही पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आता ते प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, संजय काकडे हे पुण्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, येथून त्यांना उमेदवारी देण्यास भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर नाराज झालेले काकडे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती. इतकेच नाही तर त्यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचेही बोलले जात होते. परंतु, त्यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले.