
>>विवेक दिगंबर वैद्य
‘सो।हं’ संप्रदायी ‘क्रांतिकारक संन्यासी’ श्रीस्वरूपानंद स्वामी, पावस यांच्या अवतारकार्याविषयीचा हा लेख.
राष्ट्रहित व समाजहितासाठी लोककार्य करण्याचा ध्यास आप्पांना त्यांच्या मूळ गावी, ‘पावस’ येथे आणता झाला अन् याच ध्यासातून सन 1922 च्या जून महिन्यात ‘स्वावलंबनाश्रमा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. गावातील संस्कारक्षम मुलांना एकत्र करून त्यांना असे शिक्षण द्यावे की त्यायोगे सुदृढ शरीराचा, धार्मिक संस्काराचा, कष्टाळू आणि व्यवहारपटू आदर्श देशप्रेमी विद्यार्थी तयार होईल हे यामागचे प्रमुख सूत्र होते. शिक्षणासोबतच देशभक्तीचा विचार आणि सूतकताईच्या माध्यमातून स्वदेशीचा आग्रह विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्याचे कार्य आकाराला येत होते आणि याच कालावधीत आप्पांच्या मनात राष्ट्रकार्यासोबतच पारमार्थिक विचारांची स्पष्टतादेखील निर्माण होत गेली.
दरम्यान, आप्पांचे मुंबईस्थित मामा, केशवराव गोखले यांनी पुणे येथील सद्गुरू श्रीबाबामहाराज वैद्य यांच्याकडे जाण्यास आप्पांना सुचविले. केशवराव तसेच आप्पांचे वडील विष्णुपंत यांनादेखील श्रीबाबामहाराजांचा अनुग्रह लाभला होता. यातूनच केशवरावांनी आप्पांची श्रीबाबामहाराजांशी भेट घडवून आणली. आप्पांच्या साध्या, सात्त्विक व्यक्तिमत्त्वातील ऋजुता श्रीबाबामहाराजांना प्रथमदर्शनीच आकर्षित करती झाली. दुसऱयाच दिवशी श्रीबाबामहाराजांनी आप्पांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांस अनुग्रहित केले आणि गुरुगुह्यज्ञानाचा उपदेश केला. श्रीबाबामहाराजांनी ‘दासबोधा’त समर्थांनी वर्णन केल्यानुसार ‘सो।़हं’ मंत्राची दिक्षा आप्पांना दिली आणि त्यांना ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’च्या अंतरंगाचे दर्शनही घडविले. श्रीगुरुमुखातून उमजलेल्या ज्ञानेश्वरीच्या वचनामृत वर्षावामुळे आप्पांची भावसमाधी लागली. ‘सो।़हं’च्या या दिव्य अनुसंधानात ते आत्मसुखात रंगले. बऱयाच वेळाने आप्पांची भावसमाधी उतरली. मात्र त्या अनिर्वचनीय सुखाची गोडी अनुभवलेले त्यांचे मन पुनः पुन्हा ती स्थिती प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्न करते झाले.
सद्गुरुकृपेने जीवनात अलौकिक परिवर्तन झाल्याच्या आनंदात आप्पा ‘पावस’ येथे परतले. दरम्यान, ‘अध्यात्म’ग्रंथांचा अभ्यास, स्वयंसाधना, समाजकारण अशा अनेक आघाडय़ांवर आप्पा जोमाने कार्यरत होते. सत्कर्माचरण, सदाचरण, सद्धर्माचरण आणि सात्त्विक तपाचरण यासोबत ते नित्य आत्मचिंतनात गढलेले असत. राष्ट्रीय मेळ्याच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक प्रबोधन घडावे यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यांच्या कार्याला फारसे आर्थिक पाठबळ नव्हते. घरची परिस्थितीदेखील बेतासबात होती. तरीही आप्पा न डगमगता त्यांचे कार्य करीत राहिले. ‘स्वावलंबनाश्रमा’तून शिक्षित झालेले विद्यार्थी परीक्षांमधून उत्तम यश संपादन करीत होते.
अशातच एके दिवशी आप्पांनी त्यांचे गुरू श्रीबाबामहाराज यांच्या नित्यपाठातील ‘ज्ञानेश्वरी’ची जीर्ण प्रत पाहिली तेव्हा त्यांना आपल्या गुरूंकरिता ‘ज्ञानेश्वरी’ची हस्तलिखित प्रत अर्पण करावी असे मनात आले. आप्पांनी काही दिवसांतच त्यांच्या सुंदर दाणेदार अक्षरात नऊ हजार ओव्यांची स्वहस्ते लिहिलेली ज्ञानेश्वरीची प्रत सद्गुरूंस अर्पण केली. हे पाहून श्रीबाबामहाराजांच्या डोळ्यांतून वात्सल्य ओघळले. दरम्यान, पुणे येथे झालेल्या ‘ब्रह्मसत्र’ सोहळ्यात ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’वर कीर्तन, प्रवचन तसेच विविध अभ्यासात्मक चर्चासत्रे पार पडली. त्यामुळे आप्पा ‘ज्ञानेश्वरी’ या दिव्य ग्रंथाकडे विविधांगाने पाहते झाले. त्यातूनच पुढे त्यांच्या हातून अभ्यासात्मक लेखन व मार्गदर्शन घडले.
दरम्यान, स्वातंत्र्य चळवळीच्या योगाने आप्पांवर कायदेभंगाचा ठपका ठेवण्यात आला. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. येथे त्यांना आत्मचिंतन करण्यास पुरेसा वेळ मिळाला. त्याची परिणती म्हणून त्यांच्या हातून घडलेला आत्मानुभूतीच्या नऊ अन् समर्पणाची एक असा लिखित ओव्यांचा नवरत्नहार आप्पांनी सद्गुरुचरणांशी अर्पण केला, तेव्हा त्यांना साधलेली साक्षात्काराची परमोच्च अवस्था ओळखून श्रीबाबामहाराज म्हणाले, ‘‘अरे, तू ‘स्व’रूपानंद झालास!’’. या अनुग्रहित शिष्याची होणारी उत्तरोत्तर प्रगती पाहून सुखावलेले सद्गुरू त्यांच्या स्वानुभवाच्या अलौकिक संचिताचे गाठोडे आप्पांच्या हाती सोपवून पुढे चैतन्यप्राप्तीच्या मार्गास निघून गेले.
दरम्यान, वैयक्तिक आयुष्यातील वादळे आणि प्रकृतीची कुरबुर यातून आप्पांचे मन झाकोळते झाले. त्यांच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला खचविण्यासाठी साध्याशा ‘मलेरिया’चे निमित्त झाले. त्यांच्या शारीर चैतन्यास हळुवारता आली असली तरीही त्यांचे मन कणखर व अभंग राहिले. त्यांच्यातील आत्मशक्ती जागृत आणि धगधगती राखण्यासाठी बाबा देसाई यांनी आप्पांना सावलीसारखी साथसोबत केली. याच भावावस्थेत आप्पांच्या हातून ‘अमृतधारा’ काव्यरचनेची निर्मिती झाली. दरम्यान, ‘स्वामी स्वरूपानंद’ या नावाने सुपरिचित होऊ घातलेले आप्पा त्यांचे राहते घर सोडून बाबा देसाईंच्या ‘अनंत निवास’ या वास्तूमध्ये कायमस्वरूपी मुक्कामास आले.
‘अनंत निवास’ या वास्तूमध्ये स्वामींनी ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठ’ ही ओवीबद्ध रचना केली. पुढे एकदा गीताश्लोकाचा संपूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणारी साकी त्यांच्या अंतःकरणात स्फुरली आणि त्यातूनच ‘भावार्थ गीता’ निर्माण झाली. या रचनेपूर्वी एक चमत्कार घडला. ‘स्वामी स्वरूपानंद’ भावावस्थेत ‘सो।हं’ भजनांत तल्लीन असतांना त्यांना श्रीमहाविष्णूचे सगुण दर्शन घडले. यातूनच पुढे त्यांच्या अवतारकार्याने विलक्षण वेग धरला. ‘भावार्थ गीते’मुळे हजारो भक्तजन ‘सो।हं’ संप्रदायाकडे आकृष्ट झाले. श्रीस्वामींच्या दर्शनार्थ दररोज शेकडो माणसे येऊ लागली. कित्येकांनी ‘सो।़हं’ बोध स्वीकारला आणि कित्येकांनी अनुग्रह घेतला.
दरम्यान, ‘स्वामी स्वरूपानंद’ यांनी ‘अमृतधारा’ आणि ‘भावार्थ गीता’ या आध्यात्मिक रचनांसोबत संजीवनी गाथा, अभंग ज्ञानेश्वरी, तीन प्रवचने, नित्यपाठ असे विविध स्वरूपाचे लेखन केले. स्वामी ‘सो।हं’ ध्यानाचा उल्लेख ‘भजन’ असा करीत असत तेव्हा त्यांच्यापासून प्रेरणा घेत मुंबई, वसई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी व अनेक ठिकाणी ‘सो।़हं’ परिवार स्थापन झाला. त्यातून सामुदायिक सो।़हं ध्यान, ज्ञानेश्वरी नित्यपाठ, अध्यात्मचर्चादी कार्यक्रमांतून श्रीस्वामींच्या वैचारिक बोधमार्गाचा प्रसार झाला.
कोकणच्या लाल मातीत ‘सो।हं’ तत्त्वज्ञानाची ध्वजा फडकवणारे, ‘ज्ञानेश्वरी’च्या गूढार्थांना सहजसोपेपणाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे ‘स्वामी स्वरूपानंद’ त्यांच्या जन्मगावी ‘पावस’ येथे 15 ऑगस्ट 1974 या दिवशी समाधिस्थ झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि धर्म यांचे पुनुरुत्थान व्हावे यासाठी आग्रही असणारा ‘सेनानी’ अनंतात विलीन झाला. भक्तजनांच्या डोळ्यातील करुणेच्या अंधारात ‘स्वामी स्वरूपानंद’ यांनी चैतन्याचा दीप उजळला. ‘पावस’च्या या नंदादीपाने अखिल विश्वास ‘प्रकाश’मान केले.
(उत्तरार्ध)
– [email protected]





























































