जेलमध्ये जाताच नवरोबा वठणीवर! ताबडतोब दिला पोटगीच्या रकमेचा चेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जे काम दोन वर्षांत दिले गेलेले न्यायालयाचे आदेश करू शकले नाहीत, ते काम जेलच्या पाच दिवसांनी करून दाखवल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपल्या घटस्फोटित पत्नीला पोटगी नाकारणाऱ्या नवऱ्याला जेलची हवा खायला लागताच त्याने जेलमधूनच ती रक्कम पत्नीला देऊन टाकली आहे.

उत्तर प्रदेशात राहणाऱ्या या व्यक्तिला सर्वात आधी 2017मध्ये जानेवारी महिन्यात पोटगी देण्याचे आदेश दिले होते. ती रक्कम तब्बल 4.75 लाख रुपये इतकी होती. पण या व्यक्तिने आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने पतीला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावर व्यावसायिक कारणास्तव पैसे देऊ शकत नसल्याचं पतीकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर ऑक्टोबर 2018मध्ये पुन्हा कोर्टाने त्याला नोटीस धाडल्यानंतर त्याने पोटगीचा पहिला हफ्ता म्हणून 35 हजाराचा चेक पत्नीला दिला. त्यानंतर कोर्टाने त्याला स्वतः हजर राहण्याचे आदेश देऊनही तो कोर्टात गैरहजर राहू लागला. म्हणून कोर्टाने हा अवमान असल्याचं म्हणत त्याला अटक करण्याचे आदेश दिले.

कोर्टात हजर केल्यानंतर पोटगीची उर्वरित रक्कम वारंवार आदेश देऊनही न चुकती करणे, कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणे या कृत्यांसाठी त्याला पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील पुढची सुनावणी एक महिन्यानंतरची ठेवण्यात आली होती. पण, पाचच दिवसात नवऱ्याने पुढील रक्कम तयार असल्याचं सांगत कोर्टापुढे विनंती केली. जेलमधूनच त्याने पत्नीच्या नावे चेक काढला. त्यानंतर कोर्टाने त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.