
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव शहरासह तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोपरगाव शहरामध्ये शिवजयंती उत्सव व शहिद दिनानिमित्त शनिवारी (23) रोजी सकाळी सहा वाजता छत्रपती बाल उद्यान येथील छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यास अकरा जोडप्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर शिवरायांना 21 उखळी तोफा वाजवून सलामी देण्यात आली.
शिवसेनेचे प्रत्येक शाखेत, शहरातील चौकाचौकांमध्ये मंडप उभारून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर दुसरीकडे पोवाडे लावून शिवजयंती उत्सवास प्रारंभ झाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहर प्रमुख सनी वाघ यांनी विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.
सायंकाळी सहा वाजता संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, कैलास जाधव, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, महिला उपजिल्हाप्रमुख सपना मोरे, शहर प्रमुख सनी वाघ, युवासेना शहर अध्यक्ष नितीन बोरूडे, अभिजित आव्हाड, ग्राहक संरक्षण कक्ष शहर रवी कथले, उत्सव समिती अध्यक्ष गगन हाडा, उपशहर प्रमुख कलविंदर दडियाल, प्रफुल्ल शिंगाडे, लक्ष्मण मंजुळ बाळासाहेब साळुंके,भरत मोरे, विशाल झावरे, किरण खर्डे, विक्रांत झावरे, नगरसेवक, महिला सेना आघाडी, ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोपरगाव शहरामध्ये सर्वत्र भगवे झेंडे भगवे फेटे यामुळे भगवे वातावरण तयार झाले.
दुपारी पाच रिक्षा स्टँडपासून तर दुसरी सहा वाजता अहिंसा चौकापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. एकंदरीत शिवजयंतीचा उत्साह कोपरगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे.
शिवव्याख्याते एस. झेड. देशमुख यांचे शिवव्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी अँड. जयंत जोशी होते. तसेच मराठी संस्कृती सर्जिकल स्ट्रार्इक पुलवामा हल्ल्यावर आधारीत व शिवरायांवर आधारीत भव्य नाटय,गायन तसेच डान्स स्पर्धा पार पडल्या.


































































