
दिवाळीसारखा मोठा सण साजरा करण्यासाठी दमडीही नसल्याने आणि मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालल्याने आलेल्या वैफल्यातून निलंगा तालुक्यातील डांगेवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शुक्रवारी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष सूर्यवंशी (३८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई, मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी निटूर पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष सूर्यवंशी यांच्याकडे अतिशय अल्प जमीन आहे. यंदा पावसाने दगा दिल्यामुळे शेतातून एक पैशाचेही उत्पन्न आले नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी पत्नी तसेच स्वतःच्या नावाने विविध बचत गट तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले होते. दिवाळीसारखा सण कसा साजरा करायचा, लेकीची चोळीबांगडी कशी करायची याची चिंता त्यांना लागली होती. त्यातच मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला. सरकारची कोणतीही मदत वेळेवर मिळाली नाही. याच वैफल्यातून संतोष सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.






























































