
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या 454222 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असून हे पाणी फक्त जुलैपर्यंतच पुरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तब्बल दोन लाख दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पुढचा पावसाळा येईपर्यंत मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या 3800 दशलक्ष लिटरमधून 150 दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. दरम्यान, या वर्षी तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने उपलब्ध पाणीसाठय़ाचा पुरवठा करताना पालिका प्रशासनाला खास नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने 15 नोव्हेंबर 2018 पासूनच मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे. यातच आगामी उन्हाळय़ाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठी वेगाने कमी होणार असल्यामुळे मुंबईकरांनी पाण्याची नासाडी करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
राखीव कोटय़ावर मदार
तलावात पाणीसाठा कमी असल्यामुळे दररोज 3800 दशलक्ष लिटर होणारा पाणीपुरवठा 3500 वर आणण्यात आला आहे. मात्र मुंबईकरांची गरज लक्षात घेता आणखी पाणीकपात शक्य नाही. त्यामुळे मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी गरज भासल्यास राज्य सरकारच्या परवानगीने अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातील राखीव कोटा वापरण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली.
गळती, चोरी आढळल्यास संपर्क करा
मुंबईला पाणीपुरवठा करताना तब्बल 27 टक्के पाणी गळती आणि चोरी होते. त्यामुळे गळती किंवा चोरी आढळल्यास नागरिकांनी कंट्रोल रूमशी संपर्क करावा, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे. यासाठी पूर्व उपनगरात घाटकोपर, पश्चिम उपनगरात विलेपार्ले येथे तर शहर विभागात मलबार हिल येथे कंट्रोल रूम तयार करण्यात आला आहे.
22 मार्चपर्यंतचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
मोडक सागर -44,424
तानसा -51,229
मध्य वैतरणा -50,462
अप्पर वैतरणा -73,088
भातसा -2,24,529
विहार -6,878
तुळशी -3,612
एकूण पाणीसाठा -4,54,222

























































