
सामना प्रतिनिधी, पुणे
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज घोषित केलेल्या नवव्या यादीतदेखील पुण्याचा उमेदवार घोषित होऊ शकला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ काही दिवसांचा कालावधी राहिला असताना काँग्रेसमधून पुण्याच्या जागेवर एकमत होत नाही. पक्षाची ही स्थिती बघून आमदार अनंत गाडगीळ यांनी ‘‘माझे ‘गाडगीळ’ आडनाव नसते तर मी काँग्रेस सोडली असती’’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केल्याने चर्चेला पेव फुटले आहे.
काँग्रेसकडून खासदार संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड यांची नावे मागे पडल्यानंतर पक्षातील निष्ठावंतांना लोकसभेची उमेदवारी द्यावी यासाठी खल सुरू आहे. माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड यांच्या नावांची चर्चा आहे. जिह्यातील काँग्रेस वगळता सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे, मात्र काँग्रेसकडून अद्यापि पुण्यातील उमेदवार जाहीर न झाल्याने नेमका कोणता गोंधळ सुरू आहे याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शहरातील विधान परिषद आमदार अनंत गाडगीळ यांचे नाव प्रदेश काँग्रेसने वगळले. पाठोपाठ पुण्यातील उमेदवारीचा घोळ यावर उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘‘माझे आडनाव ‘गाडगीळ’ नसते तर मी काँग्रेस सोडली असती’’ असे वक्तव्य केले. गाडगीळ यांचे आजोबा काकासाहेब आणि वडील विठ्ठलराव गाडगीळ केंद्रात मंत्री आणि गांधी घराण्याशी घनिष्ठ होते. त्यांचे नातू अनंतराव यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे या चर्चेला पेव फुटले. शहरातील काँग्रेस नेत्यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आम्ही पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे एका नेत्याने सांगितले.

























































