
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबापुरीची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून प्रत्येक निवडणुकीत मतदारांचा आकडाही फुगत चालला आहे. अख्ख्या मुंबईत हेच चित्र असले तरी उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चांदिवली विधानसभा क्षेत्र मात्र त्याला अपवाद ठरले आहे. 2014 मध्ये चांदिवलीत 412 बुथमध्ये चार लाख 11 हजार एवढे मतदार होते. त्यात सध्या घट झाली असून एकूण बुथची संख्या 337 तर मतदारांची संख्या 3 लाख 36 हजारांपर्यंत घटली आहे. त्यामुळे घटलेले मतदार गेले कुठे, असा सवाल सर्वच पक्षांचे कार्यकर्ते करत आहेत.
कामगार वर्गाचे प्राबल्य असलेल्या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वांद्रे पश्चिम, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कालिना, चांदिवली आणि कुर्ला-नेहरूनगर या सहा विधानसभांचा समावेश आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 15 लाख मतदार होते, त्यापैकी सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या चांदिवलीत चार लाख बारा हजार मतदार होते, मात्र मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेल्या या विभागात अनेक नागरिकांची दुबार नावे होती. तसेच कित्येक मतदार बाहेर वस्तव्याला गेल्यानंतरही त्यांची नावे कमी केली नव्हती. त्यामुळेच मतदारांचा आकडा फुगला होता. मात्र नुकत्याच झालेल्या मतदार याद्यांच्या पडताळणीत दुबार असलेली नावे कमी झाली आहेत. तसेच मतदारसंघाबाहेर गेलेल्या मतदारांची नावेही कमी केली आहेत. त्यामुळेच मतदारांचा आकडा घटल्याची माहिती मतदार याद्या तयार करण्याचे काम पाहणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिली.
कोणाला फटका बसणार…
चांदिवली विधानसभा क्षेत्रातील मतदार कमी झाल्याने लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका कोणाला बसणार अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान, घटलेल्या मतदारांमध्ये मुस्लिम नावांचा आकडा मोठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चांदिवलीतील मतदार घटलेले असताना एकूणच इतर विधासभा क्षेत्रांतील मतदारांची संख्या वाढली असल्याने त्याचा लोकसभा निवडणुकीत फारसा परिणाम होणार नसला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र याचा परिणाम दिसणार आहे.





























































