गडनदीवरील धरण रिकामे केल्याने 15 वर्षांनी झाले गतवैभवातील खाणाखुणांचे दर्शन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, संगमेश्वर

एखादा विकासाचा प्रकल्प आणायचा म्हटले की, विस्थापितांचा प्रश्न पुढे येतो. विस्थापित होणे म्हणजे स्वत्व हरवल्यासारखेच असते. आपले गत वैभव सोडून जातांना पुनर्वसितांच्या केवळ मनाला नव्हे तर, हृदयालाही चटके बसतात. संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे येथे गडनदीवर उभारण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पासाठी शेकडो लोकांनी आपल्या रम्य आठवणींना तिलांजली दिली आणि ते अन्यत्र स्थलांतरित झाले. याच धरणाच्या मुख्य गेट वॉल मध्ये बिघाड झाल्याने नुकतेच धरण रिकामे करावे लागले आणि पूर्वीच्या घरांचे चौथरे, विहीरी, पाण्याची तळी, देवस्थानचे चौथरे 15 वर्षांनी ग्रामस्थांच्या दृष्टीस पडले. हे समजताच अनेक जण जड अंत:करणाने येथे भेट देत नतमस्तक झाले.

सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याजवळ वसलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे, पाचांबे, कुटगिरी आदी गावांना गडनदीवर उभारण्यात येणाऱ्या मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित होण्याची वेळ आली. ज्या मंदिराच्या आवारात पारंपरिक सण साजरे झाले, ज्या घरात बालपणीच्या रम्य आठवणी दाटलेल्या होत्या, ज्या सार्वजनिक विहीरींवरून पाणी भरले गेले, ज्या मैदानावर सवंगड्याबरोबर विविध खेळ खेळले गेले आणि ज्या शेतांमधून घाम गाळला गेला अशी सर्व ठिकाणे गडनदी धरणाच्या बुडीत क्षेत्रात आली.

त्यामुळे 15 वर्षांपूर्वी हे सारे सोडून विस्थापित झालेली मंडळी गत आठवड्यापासून या धरणातील पाणी सोडून धरण दुरुस्ती कामासाठी रिकामे करण्यात आल्याचे समजल्यानंतर परत आपल्या जुन्या श्रद्धास्थानांना भेट देण्यासाठी कुचांबे गावी आले. जुन्या वास्तूंचे, मंदिरांचे, सार्वजनिक ठिकाणांचे भग्नावशेष पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तब्बल 15 वर्षानंतर ऐन शिमगोत्सवाच्या काळात पाण्याखाली गेलेल्या जुन्या आठवणी पाहून नतमस्तक होता आले याचा आनंद अवर्णनीय असल्याचे अंकुश अशोक कदम यांनी सांगितले.