शिवसेना-भाजप युती हा फेव्हीकॉलचा जोड आहे, तुटणार नाही! : सुभाष साबणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

‘लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आहे. या दोन्ही पक्षांचा जोड अभेद्य आहे. तो फेव्हीकॉलप्रमाणे आहे. कधीही तुटणार नाही. शिवसेना प्रतापरावांच्या खंबीर पाठिशी राहील आणि या निवडणुकीत त्यांना देगलूर-बिलोलीमधून 25 हजारांची लीड मिळवून देईल’, असे आमदार सुभाष साबणे यांनी सांगितले. नांदेड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंघ पुरी, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, आमदार तुषार राठोड, आ.राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, प्रकाश पाटील चितळकर, आमदार सुजीतिंसह ठाकूर, विजय सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

साबणे पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या राजवटीत जेवढा विकास झाला नाही तेवढा युती सरकारने साडेचार वर्षात केला. काँग्रेसच्या राज्यात मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात एक किलोमीटरचाही महामार्ग टाकला नाही. परंतु महायुतीच्या राज्यात गडकरींनी नऊ हजार कोटी रुपयांचा निधी देऊन शेकडो किलोमीटरचा महामार्ग तयार केला. काँग्रेसच्या राज्यात पीकविम्याचे पैसे मिळत नव्हते, युतीच्या राज्यात ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच देशाच्या सीमा सुरक्षित राहणार की नाही हे ठरविणारी ही निवडणूक असल्याने मतदारांनी नरेंद्र मोदींच्या पाठिशी आपली शक्ती उभी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणाने श्रोत्यांमध्ये उत्साह आणला. त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात झालेल्या विकासाची सविस्तर माहिती दिली.