
सामना ऑनलाईन । गांधीनगर
मी गांधीनगरात कसा काय आलो याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अनेकांच्या पोटातही दुखत आहे; पण त्याचा इलाज आमच्याकडे आणि मतदारांकडे आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांवर चढवला. आमच्या विरोधात आघाडी करणाऱ्यांचा नेता कोण, असा सवाल करतानाच लोकसभा निवडणुकीत आमच्याविरुद्ध कुणीच नाही, कारण सगळीकडे फक्त भगवा, भगवा आणि भगवाच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अमित शहा यांचा जबरदस्त रोड शो झाला आणि मेळावाही झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्यात मतभेद होते, पण आता आमचे मन जुळले आहे. आम्ही एकमेकांशी भांडत असल्याचा अनेकांना आनंद होत होता. मात्र अमित शहा ‘मातोश्री’ निवासस्थानी आले. आम्ही चर्चा केली आणि अनेक मुद्दे निकालात काढले. भेट झाल्यानंतर सगळे वाद आम्ही संपवले आहेत.
अब तक 56
उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जबरदस्त तोफ डागली. ते म्हणाले, विरोधकांचे 56 जण आहेत. त्यांना बघून ‘अब तक 56’ या चित्रपटाची आठवण झाली. विरोधकांनी हात मिळवले आहेत. दिल मिले ना मिले, हात जरूर मिलाना चाहीए असे या विरोधकांचे सुरू आहे. त्यांना कोणतीही विचारधारा, दिशा नाही आणि नेता नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. तुमचा नेता कोण आहे याचे उत्तर त्यांनी द्यावे. प्रत्येकजण पंतप्रधान बनण्यासाठी उतावळा आहे. त्यामुळे आतापासूनच ते एकमेकांचे पाय खेचत आहेत. ते पुढची वाटचाल कशी करणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.
आमचे ध्येय एकच!
आमची विचारधारा एकच आहे. हिंदुत्व आपला श्वास आहे आणि तो थांबला तर जगायचे कसे, असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदुत्वाच्या धाग्यानेच शिवसेना आणि भाजप बांधले गेले आहेत. गेल्या 25 वर्षांतील आपली युती विसरता कामा नये. गेल्या साडेचार वर्षांत आमच्यात मतभेद जरूर झाले, पण तो आता भूतकाळ झाला. असे म्हणतात, हात मिळाले, पण मने मिळाली नाही तर काय फायदा! आमची मने आता जुळली आहेत. गेल्या 25 वर्षांपूर्वी शिवसेना आणि भाजप या दोघांच्या खांद्यावर भगवा होता. आमच्याकडे कोणीच येत नव्हते. आम्ही अस्पृश्य होतो. अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल मात्र आमच्यासोबत होते. 25 वर्षे आम्ही एकत्र चाललो, लढलो आणि अखेर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवलाच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंसोबत सेल्फीसाठी झुंबड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गांधीनगरमध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. सभास्थानी तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचीच चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात प्रतिसाद दिला. कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. त्यांना सेल्फीसाठी विनंती केली. उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या विनंतीचे स्वागत करून सर्वांना आपल्याबरोबर सेल्फी काढू दिले.
व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल, लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवान यांच्यासह ‘एनडीए’तील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.
चार किलोमीटरचा ‘रोड शो’
अमित शहा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळय़ाजवळ जाहीर सभा घेतल्यानंतर ‘रोड शो’ काढला. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मरण करून शहा यांच्या रोड शोला सुरुवात झाली. नारणपुरा क्रॉस रोड, कामेश्वर मंदिर, प्रभात चौक या मार्गावरून हा रोड शो निघाला. त्यात चार किलोमीटरपर्यंत लोकांची गर्दी होती.
शहा यांना शुभेच्छा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊनच अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आल्यावर वातावरण तापते; मात्र आता वातावरण तापवण्यासाठी विरोधी पक्ष आहेच कुठे? सगळीकडे फक्त भगवा रंग आहे.






















































