
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 18 लाख 83 हजार 542 मतदार आहेत. सर्वाधिक मतदार लातूर शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीकांत यांनी ही माहिती दिली. त्यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयेळे उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी आजारी तसेच वयोवृद्ध नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक रथ व्यवस्था केली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर बालसंगोपन केंद्र उभारण्यात येणार असून या केंद्रामध्ये अंगणवाडीताई मुलांचा सांभाळ करणार असून मुलांना खेळण्यासाठी तसेच खाऊची व्यवस्थाही यावेळी करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे मतदान केंद्राबाहेर मंडप टाकण्यात येणार आहेत.
लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 18 लाख 83 हजार 542 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 9 लाख 91 हजार 940 आहे. तर महिला मतदारांची संख्या आठ लाख 98 हजार 593 आहे. 9 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 3 लाख 19 हजार 252 मतदार आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 68 हजार 549 मतदार संख्या आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 3 लाख 17 हजार 671 मतदार आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन लाख 95 हजार 78 मतदार आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन लाख 11 हजार 73 मतदार आहेत तर लोहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 2 लाख 71 हजार 919 मतदार आहेत. लातूर जिल्ह्यात 3772 सैन्यदलातील मतदार असून त्यांना ऑनलाइन मतपत्रिका पाठवण्यात आल्या असून 23 मे 2019 सकाळी 11 वाजेपर्यंत पोस्टाद्वारे मतपत्रिका स्विकारल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1950 या टोल फ्री क्रमांकावर लातूर जिल्ह्यातून मतदारांनी कॉल केले असून ती संख्या 1599 असल्याची माहिती त्यांनी दिली. लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 2003 मतदान केंद्राची संख्या आहे. सहाय्यक मतदान केंद्राची संख्या 72 एवढी आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात 355 मतदान केंद्र लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 326 मतदान केंद्र, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात 355 मतदान केंद्र, उदगीर विधानसभा मतदार संघात 315 मतदान केंद्र, निलंगा विधानसभा मतदार संघात 340 मतदान केंद्र, तर लोहा विधानसभा मतदारसंघात 312 मतदान केंद्र आहेत.






























































