दोन भावांच्या वादात तरुणांचा हकनाक बळी, दोन निष्पाप तरुणांवर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

दोन भावांच्या जमिनीवरून असलेल्या वादात भावाला ठार मारण्याऐवजी दुसऱ्याच दोन तरुणांवर पिस्तुलाने गोळीबार केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील कुरुळ गावात घडली. या गोळीबाराच्या हल्ल्यात सागर पाटील हा तरुण ठार झाला असून गौरव भगत याला मुंबईला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेमध्ये एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या दोन साथीदाराचा शोध अलिबाग पोलीस घेत आहेत.

अलिबाग शहराला लागून असलेल्या कुरुळ गावातील टेकडीवर रविवारी मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कुरुळ गावातील राजू मगर व जितू मगर या सख्या भावांमध्ये जागेचा वाद होता. या वादातून राजू मगर याने आपल्या भावाचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने निलेश वाघमारे व अन्य अजून एक जण याना सोबत घेतले. या तिघांनी रविवारी रात्री सव्वाबाराच्या दरम्यान टेकडीबरून येणाऱ्या सागर पाटील व गौरव भगत यांच्या वाहनाच्या मध्ये आपली ऍक्टिव्हा (एमएच 06 बीएल 449) मध्येच थांबवून त्याच्यावर पिस्तूलाने गोळीबार केला. त्यानंतर मारेकऱ्यांना स्वतःचे वाहन तेथेच टाकून पलायन केले.

या हल्ल्यात सागर पाटील यांच्या पाठीमागे व छातीच्या ठिकाणी गोळ्या लागल्या. तर गौरव भगत यांच्या उजव्या छातीत गोळी लागून गंभीर जखमी केले. या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर सागर पाटील यांने प्राण सोडला. तर गौरव भगत याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे.

मात्र मारेकरांनी केलेला हा हल्ला राजू मगर याचा भाऊ जितू मगर याच्यावर करायचा होता. मात्र जितू मगर ऐवजी त्यांनी सागर व गौरव याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सागर याचा हकनाक बळी गेला असून गौरव हा गंभीर जखमी झाला आहे. जितू मगर हा गौरव व सागर यांच्या वाहनाच्या मागून आपल्या वाहनावर येत होता. सागर व गौरव याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जितू मगर याने मारेकऱ्यांपैकी निलेश वाघमारे याला पळताना पकडून ठेवले. तर दोन जण मारेकरी फरार झाले आहेत. निलेश वाघमारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन फरार आरोपींचा तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर गुन्हा घडलेल्या घटनास्थळी पोलीसानी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.