
सामना प्रतिनिधी । नगर
महानगरपालिकेच्या वसुली विभागाने यंदाच्या वर्षी रेकॉर्डब्रेक वसुली केली असून सुमारे 40.99 कोटींच्या थकबाकीसह 28.35 कोटींची चालू मागणी अशा तब्बल 69.35 कोटींची वसुली करण्यात आली आहे. महानगरपालिकेत तोकडी वसुली होईल असे वाटत असताना मोठ्या प्रमाणात वसुली झाली आहे. 2018-2019 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकीसह एकूण 241.67 कोटींची मागणी होती. यात 194.76 कोटींच्या थकबाकीचा तर 46.91 कोटींच्या चालू कर आकारणीचा समावेश आहे.
आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच मालमत्ता करावरील शास्तीमध्ये देण्यात आलेली सवलत व त्यानंतर थकबाकीदारांवर कारवाईसाठी उचलण्यात आलेल्या कठोर पावलांमुळे महापालिकेने मागील आर्थिक वर्षात ‘रेकॉर्ड ब्रेक’ वसुलीची नोंद केली आहे.
तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांनी एप्रिल ते जून महिन्यात दोन महिन्यांसाठी शास्तीमध्ये सवलत जाहीर केली होती. त्याचा फायदा घेत थकबाकीदारांनी मोठ्याप्रमाणात कराचा भरणा केला होता. 12 एप्रिल ते 11 जून 2018 या कालावधीत तब्बल 39.77 कोटींची वसुली झाली होती. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात वसुली झाल्यामुळे मनपाच्या आर्थिक अडचणी कमी झाल्या होत्या.
2018-2019 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकीसह एकूण 241.67 कोटींची मागणी होती. यात 194.76 कोटींच्या थकबाकीचा तर 46.91 कोटींच्या चालू कर आकारणीचा समावेश आहे. 31 मार्च अखेर झालेल्या वसुलीमध्ये 40 कोटी 99 लाख 30 हजार 104 रुपयांच्या थकबाकीची वसुली झाली असून, 28 कोटी 35 लाख76 हजार 263 रुपयांची चालू मागणी वसूल झाली आहे. तसेच 12 कोटी 17 लाख 68 हजार 8 रुपयांच्या शास्तीची वसुलीही या वर्षभरात झाली आहे.





























































