सराफा व्यापाऱ्यावर दरोडा घालणारे चार पोलीस कर्मचारी बडतर्फ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, लातूर

उदगीर शहरातील सराफा व्यापारी सचिन बालाजी चन्नावार यास चार तास डांबून ठेऊन त्याच्या जवळील दीड लाख रुपये घेणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, 29 मार्च रोजी रात्री सराफा व्यापारी सचिन बालाजी चन्नावर हे आपले दुकान बंद करून दुकानातील रोख रक्कम 6 लाख रुपये घेऊन घराकडे जात होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रस्त्यात अडवले. त्यांच्याजवळ सहा लाख रुप्ये असल्याचे समजताच त्यांना आचारसंहितेचा बडगा दाखवत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. एका फर्निचरच्या दुकानात त्यांना चार तास डांबून ठेवले आणि तब्बल दीड लाख रुपये काढून घेऊन नंतरच त्यांची सुटका केली होती.

या प्रकरणी निवडणूक विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत 1 एप्रिल रोजी चारही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकही करण्यात आली आहे. आज श्रीहरी राम डावरगावे, श्याम बडे, महेश खेळगे, रमेश बिरले या चारही पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाची अब्रुच गेली आहे.