विहिरीच्या अनुदानात कमिशनची मागणी: शेतकरी दांपत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

पंचायत समितीच्या योजनेतून बांधत असलेल्या विहिरीचे अर्धे बांधकाम झाले तरीही विहिरीच्या बांधकामाचा धनादेश देण्यास पंचायत समिती अधिकाऱ्याकडून चालढकल करण्यात येत आहे. विहिरीसाठी मंजूर अनुदानातील 25 टक्के रक्कम ‘कमिशन’ म्हणून द्यावी यासाठी अधिकारी अडून बसले. मात्र ही रक्कम 70 हजारांच्या घरात गेल्याने शेतकरी पतीपत्नी हतबल झाले. आधीच कर्जाचा बोजा असताना अनुदानाचा धनादेशही मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकरी पतीपत्नीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावातील शेतकरी प्रकाश पाटील यांनी पंचायत समितीच्या योजनेतून विहीर बांधण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जानुसार पाटील यांना विहिरीसाठी 2 लाख 90 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले. शासनाच्या नियमानुसार आधी काम सुरू केल्यानंतर अनुदान मिळणार म्हणून पाटील यांनी 20 फूट विहीर खोदली. मात्र हे अनुदान मिळण्यासाठी अनुदानातील 25 टक्के रक्कम द्यावी अशी मागणी न्हानू देवराम धनगर या अधिकाऱ्याने पाटील यांच्याकडे केली. मात्र ही रक्कम 70 हजारच्या घरात जात असल्याने या शेतकऱ्याची ऐपत नसल्याचे त्यांनी धनगर यांना सांगितले. मात्र धनगर ते काहीही ऐकून घेत नसल्याने निराश झालेल्या पाटील पतीपत्नीने आज अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या गुप्तवार्ता विभागाचे पोलीस तेथे धावले. दोन जणांनी शेतकरी प्रकाश पाटील यांना प्रतिबंध करीत ताब्यात घेतले. त्याचवेळी त्यांच्या पत्नीने डिझेलचा कॅन स्वतःच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेटवून घेऊ नका, जिल्हाधिकाऱ्याकडे चला त्यांच्याशी चर्चा करा, अशी विनवणी पोलीस कर्मचाऱ्यानी केली आणि पतीपत्नीला जिल्हाधिकाऱ्याकडे नेले. यावेळी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हावी. दोषी असणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नीने व्यक्त केली.

अगोदरच माझ्यावर सरकारी बँकेचे आठ लाख कर्ज आहे. अनुदानाचे पैसे मिळविण्यासाठी सुमारे 70 हजार रुपये आणायचे कुठून? याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयात पत्रव्यवहार केला पण दखल घेण्यात आलेली नाही. तेव्हा नाइलाजास्तव आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.– प्रकाश पाटील, पीडित शेतकरी.