
सामना प्रतिनिधी, जळकोट
डोईवर असलेल्या कर्जास कंटाळून पाटोदा (बु.) तालुका जळकोट येथील शेतकरी भीमाशंकर उत्तम केंद्रे (वय 35) यांनी पाटोदा शिवारातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 2 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत शेतकरी भीमाशंकर केंद्रे हे बँकेच्या कर्जास कंटाळले होते. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी 2 एप्रिल रोजी सकाळी जळकोट – उदगीर रोडवरील केंद्रे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे जळकोट येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली एनपीसी पी.आर. चिमनदरे व एएसआय बनसोडे हे करीत आहेत. मयतावर ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली. मयत भीमाशंकर केंद्रे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई – वडील असा परिवार आहे.






















































