
सामना प्रतिनिधी । नाशिक
शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी केले. विहीतगाव येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ विहीतगाव येथे सोमवारी देवळाली मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी घोलप बोलत होते. शिवसेना-भाजपा युतीच्या राज्य व केंद्रातील सरकारने जनहिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. विकासकामे केली आहेत. हे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या खोट्या केसमुळे मागील पंचवार्षिकला मी लोकसभेची निवडणूक लढू शकलो नाही, पण परमेश्वराने भुजबळांनाच तुरुंगात टाकले होते, असेही घोलप यांनी सांगितले. विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपले विचार व कार्य जनतेसमोर आणावे, हेमंत गोडसे यांना यावेळी पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी गोडसेंना विजयी करा, असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी केले.
कार्यालयाचे उद्घाटन
सिडकोतील सावतानगर येथे गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. जनहित आणि सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारालाच विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. या दोन्ही कार्यक्रमांना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सिमा हिरे, महापालिका सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर, दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.





























































