लातूरात वयोवृध्द महिलेस तिघा तरुणांनी भरदिवसा लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पायी चालत जाणाऱ्या वयोवृध्द महिलेस तिघा तरुणांनी सोने पिशवीत काढून ठेवा, असे सांगून १ लाख ५० हजार रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या, गंठण पळवले.

शांताबाई केरबा पाटील (वय ७२) रा. मित्र नगर लातूर यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. १ एप्रील रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौकातून त्या अ‍ॅटोमधून आदर्श कॉलनी येथे उतरल्या. मुलाच्या घराकडे पायी चालत जात असताना एकजण त्यांच्या जवळ आला. तुम्हाला दोघे बोलावत आहेत असे सांगितले. पाठीमागे दोघे थांबलेले होते. कोण आहे म्हणून त्यांच्याजवळ जाऊन विचारले असता पुढे साहेब आहेत. तुमच्या जवळचे सोने पिशवीत ठेवा असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हातातील सोन्याच्या पाच तोळयांच्या पाटल्या आणि गळ्यातील एक तोळ्याची बोरमाळ काढून त्यांनी पर्समध्ये ठेवली. त्याचवेळी पर्समधील दागिने त्यांनी नजर चकवून काढून घेतले. तिघेही काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन पळून गेले. थोडे अंतर पुढे जाऊन त्यांनी पर्स उघडून पाहिली असता आतमध्ये सोन्याचे दागिने नव्हते. मुलाच्या घरी जाऊन त्यांनी ही घटना मुलास सांगितली. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. अज्ञात तिघांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.