पाणीटंचाईने घेतला शेतकऱ्याचा बळी, बोअरवेलमधून मोटर बाहेर काढताना अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे बोअरवेलमधून कप्पीच्या साहाय्याने विद्युत मोटर बाहेर काढताना हुक निसटल्याने शेतकरी नारायण परमेश्वर भोरे वय ४० यांच्या जबड्यात हुक घुसून डोक्याला जबर मार लागल्याने मंगळवारी त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. नारायण भोरे यांच्या मागे आई, वडील, पत्नी तीन मुली व एक मुलगा आहे.

सध्या तालुक्यात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. तलाव विहिरी कोरड्या पडल्या आहेत. कूपनलिकांनी तळ गाठला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेलला पाणी येत नाही. जनावरांना व लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल मधील विद्युत मोटार खाली सोडून पाहू असे नारायण भोरे यांनी आपला पुतन्या संतोष भोरे यास म्हटले व दोघे बोअरवेल मधील मोटार खाली सोडण्यासाठी गेले परंतु बोअरवेल मध्ये मोटार अडकलेली आहे असे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी टॅक्ट्रर व कप्पीच्या साहाय्याने मोटार वर घेण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक कप्पीतून हुक निसटला व नारायण भोरे यांच्या जबड्यात घुसून तोंड फाटले, डोळा निकामी झाला व डोक्याला जबर मार लागला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुतण्या संतोष भोरे हा किरकोळ जखमी झाला.

नारायणचा भाऊ तीन वर्षापूर्वी एका अपघातात मृत्यू पावला होता. वृद्ध आई वडिलांना नारायण हा एकमेव आधार होता. तोही नियतीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे वृद्ध आई वडील व लहान मुले उघड्यावर आली आहेत.