परभणीतील मतदार शिवसेनेच्याच पाठीशी-राज्यमंत्री वायकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणीतील जनता ही शिवसेनेवर निस्सीम प्रेम करणारी आहे. त्यामुळेच परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो. परभणीतील मतदारांनीच शिवसेनेला मान्यता मिळवून दिली आहे याची ओळख करुन देत परभणीतील मतदार हा शिवसेनेच्याच पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा ठाम विश्वास शिवसेनेचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार विनोद घोसाळकर, आमदार डॉ. राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, मोहन अग्रवाल, संजय शेळके, गंगाप्रसाद आणेराव, राजू कापसे, विठ्ठल रबदडे, राजेश देशपांडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे व विजय गव्हाणे यांनी समायोचित मत व्यक्त केले.

यावेळी पुढे बोलताना राज्यमंत्री वायकर म्हणाले, शिवसेनेच्या गंगाखेड येथील कार्यकर्ता मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल आहे. या मेळाव्यावरुन शिवसेना भाजपा युतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. परभणीची जागा ही पारंपारीक शिवसेनेची जागा म्हणून ओखळली जाते. परभणीने शिवसेनेला पराजय दाखविला नाही. नेते गेले परंतु मतदार मात्र शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ही निवडणूक देशपातळीवरील असून कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. या नेतृत्वास साथ देण्यासाठी आणि हिंदुत्वावादी विचारांची मत विभागणी होऊ नये, यासाठी युती करण्यात आली आहे. युती करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न, नाणार प्रकल्प आदी मुद्दांचा विचार करण्यात आला आहे. देशाला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी परभणीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले. ५६ विचारांचे पक्ष स्थिर सरकार देणार काय? असा सवाल उपस्थित केला. परभणीत तिरंगी लढत होण्याची शक्यता यावेळी गृहराज्यमंत्री वायकर यांनी व्यक्त केली. नेते इकडे तिकडे गेले पण मतदारराजा जाग्यावर आहे आणि तो शिवसेनेच्या पाठीशी आहे. हे आगामी निवडणुकीवरुन दिसून येईल, असा विश्वासही यावेळी वायकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना विधानसभाप्रमुख माणिक पोंढे, रामप्रसाद रणेर, अरुण झांबरे, संदीप देशमुख आदी उपस्थित होते.