तुम्हालाच लाज कशी वाटत नाही; भाजपचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीवर प्रतिहल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या ‘लाज कशी वाटत नाही’ या प्रचाराच्या टॅगलाइनला भाजपने ‘तुम्हाला लाज कशी वाटत नाही’ अशा शब्दांत प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला चढवला आहे. तुमच्या काळात हजारो कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला,  मुख्यमंत्री पदावर असताना आदर्श घोटाळा केल्यामुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागले, शेतकऱयांनी पाणी मागितले तर धरणात करंगळी वर केली त्याची तुम्हाला लाज वाटत नाही का, असा प्रतिप्रश्न भाजपने केला.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला.  ‘लाज कशी वाटत नाही’ अशी निवडणूक प्रचाराची टॅगलाइन करणाऱया काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱयाला इतके निगरगट्टपणे लाज कशी वाटत नाही हे कसे विचारू शकता, असा सवाल करताना तावडे म्हणाले की, साडेचार-पाच वर्षांत आमच्या सरकारने विकासाची कामे केली, आपल्या देशाची सुरक्षा वाढली तसेच खऱया अर्थाने या राष्ट्राची आर्थिक प्रगती झाली त्याचा अभिमान काँग्रेस आघाडीला वाटला पाहिजे.

पृथ्वीराज चव्हाणांवर टीका

पृथ्वीराज चव्हाण यांनी बहुधा गेल्या दहा वर्षांत प्रथमच शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलेले आपल्या वाचनात आले, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे मनापासून बोलले की निवडणुकीपुरता बोलले, असा प्रश्न त्यांनी केला. निवडणुकीसाठी महाआघाडी म्हणून एकत्र आले असल्यामुळे अजित पवार यांच्या बाजूने बोलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे का हे खरेच एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगावे, असा टोलाही तावडे यांनी मारला.

शरद पवारांवर शरसंधान

जर शरद पवार यांना खरेच असे वाटत असेल की त्यांच्या घराण्याची काळजी करण्याचे काही कारण नाही. तर रोहित काय करतो, पार्थ काय करतो, दादांचे वक्तव्य कसे असते, याची सर्व माहिती शरद पवार यांना आहे. ते कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळे आपल्या घरातील प्रश्न आपण सोडवतील अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली.