खासदार संजय जाधव यांचा विजय निश्चित- संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मंठा

परभणी लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातील कार्यकर्ते आपसात समन्वय ठेवून महायुतीचा धर्म पाळतात, कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच खा. संजय जाधव यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केला. जालना जिल्ह्यातील मंठा येथे महायुतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, भाजपाचे राहुल लोणीकर, मुंबईचे उपविभाग प्रमुख अशोक पटेल, परभणीचे सहसंपर्कप्रमुख विवेक नावंदर यांच्यासह शिवसेना-भाजप-रिपाइं प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या भाषणात संपर्कप्रमुख घोसाळकर यांनी सांगितले की, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला तर आहेच या मतदारसंघातील जनतेचे शिवसेनेवर विशेष प्रेम असल्यामुळे ते धनुष्यबाणाला मतदान करतात. याचा मला सार्थ अभिमान आहे असे घोसाळकर यांनी सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी, मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत खासदार संजय जाधव यांना 50 हजार मतांची लीड देणार असून ही निवडणूक कार्यकत्र्यांची आहे. ही निवडणूक एका सर्कलची नव्हे तर नव्हे तर संपूर्ण देशाची निवडणूक आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी संजय जाधव यांना विजयी करण्यासाठी तन-मन-धनाने जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले. भाजप युवा नेते राहुल लोणीकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, मागील तीस वर्षांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी चालविलेल्या युतीचा वारसा आजही राज्यात व देशात कायम आहे,विकासाच्या अजेंड्यावर शिवसेना-भाजप एकत्र आले.

त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपसातील हेवेदावे सोडून कामाला लागावे, नरेंद्र मोदी हेच देशाचे सक्षम पंतप्रधान आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करून संजय जाधव यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.