
सामना ऑनलाईन । मुंबई
एमयूटीपी तीनअंतर्गत मुंबईकरांना मिळणाऱ्या47 वातानुकूलित लोकलचे तंत्रज्ञान अत्यंत हायफाय असणार आहे. नेहमीच्या लोकलला दर तीन डब्यांमागे एक मोटार असते तर या नव्या एसी लोकलला दर दोन डब्यांमागे एक मोटार असणार आहे. त्यामुळे गाडीची वेग पकडण्याची क्षमता वाढणार असून दोन लोकलमधील अंतर (हेडवे) सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-3 योजनेंतर्गत उपनगरीय रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी अत्याधुनिक 47 वातानुकूलित लोकल टप्प्याटप्प्याने मुंबईकरांना मिळणार आहेत. सुमारे 2899 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यात 12 डब्यांच्या एकूण 47 एसी (एकूण 565 डबे) लोकल आहेत. सध्याच्या एसी लोकलला दर तीन डब्यांमागे एक मोटार आहे. नव्या आधुनिक एसी लोकलमध्ये मात्र दर दोन डब्यांमागे एक मोटार असल्याने तिचा वेग पकडण्याची क्षमता प्रचंड वाढणार आहे. सध्याच्या एसी लोकलचे दरवाजे उघडझाप होण्यास जादा वेळ खर्च होतो. त्यामुळे एक एसी लोकल चालविण्यासाठी वेळापत्रकातील दोन साध्या लोकलच्या फेऱ्यागमावण्याची भीती असते. नव्या 47 एसी लोकलची वेग पकडण्याची क्षमता जादा असल्याने गाडी पटकन स्थानकात येईल आणि वेगाने निघेलही. त्यामुळे दोन लोकलमधले अंतर (हेडवे) कमी होऊन वेळापत्रकातील इतर गाड्यांवर परिणाम होणार नाही.
एसी लोकलच्या कोचचे डिझाईन युजर फ्रेंडली कसे असावे याची जबाबदारी अहमदाबादच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’कडे (एनआयडी)सोपविण्याचा विचार आहे. रेल्वेची रिसर्च डिझाईन ऍण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ)मार्गदर्शनखाली हे काम करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे. – आर. एस. खुराणा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
























































