
सामना प्रतिनिधी । नरसीफाटा
मी एकदा नांदेड लढलेलो आहे. कोणाचे कुठे संबंध आहेत हे मला माहीत आहे. डोक सरकलं तर फोटो देखील बाहेर काढू असा इशारा देतानांच आम्हाला बी टीम म्हणणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ते विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत की नाही? याचा अगोदर खुलासा करावा, असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
नांदेड लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.यशपाल भिंगे यांच्या प्रचारार्थ सोमवारी नरसी येथील प्रचंड जाहीर सभेत बोलतांना अँड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे चांगलेच वाभाडे काढले. यावेळी उमेदवार प्रा.यशपाल भिंगे, लोकस्वराज्य आंदोलन प्रमुख प्रा.रामचंद्र भरांडे, अँड.अण्णाराव पाटील, शिवानंद हैबतपूरे यांची मंचावर उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यातील सहकारी कारखानदारी मोडीत काढून नंतर ते साखर कारखाने स्वतःच विकत घेण्याच्या प्रवृत्तीवर कडाडून टीका करतांना लुटारु पुढाऱ्यांना आता घरी बसवा, असे आवाहन देखील अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. आपले उमेदवार प्रा.भिंगे हे विजयी झाल्यानंतर जिल्ह्यातील असे कारखाने पुन्हा सहकारी करू असे आश्वासन अँड.आंबेडकर यांनी दिले.
काँग्रेस घराणेशाही सोडून बहुजनांना सोबत घ्यायला तयार नसल्यानेच आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत उतरल्याचे अँड.आंबेडकर म्हणाले. आता मात्र काँग्रेसचे अनेक उमेदवार लक्ष देण्याची विनंती करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अँड.आंबेडकर यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना टार्गेट केले.
नायगांव येथील सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ सोनकांबळे व कैलास भालेराव यांच्यासह अनेकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. प्रा.यशपाल भिंगे यांचा जाहीरनामा यावेळी प्रकाशीत करण्यात आला. रावसाहेब पवार, अण्णाराव पाटील, प्रा.रामचंद्र भरांडे, उमेदवार यशपाल भिंगे यांनीही यावेळी मनोगत मांडले. रणरणत्या ऊन्हात देखील सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सभेचे सूत्रसंचलन नीळकंठ ताकबीडकर यांनी केले.

































































