
सामना प्रतिनिधी । नगर
दहशतीच्या कारणामुळेच नगरच्या औद्योगिक वसाहतीतुन उद्योग निघुन गेले, अनेक कामगार देशोधडीला लागले. या औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न आजपर्यंत झाले नाहीत. याचा परिणाम युवकांच्या रोजगारावर झाला. नगर औद्योगिक वसाहतीला पुर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी माझे प्रयत्न असतील अशी ग्वाही भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
नगर तालुक्यातील निवडणुक प्रचारार्थ डॉ.सुजय विखे पाटील यांनी निमगाव वाघा, नेप्ती, हमीदपुर, जखनगाव, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा आदि गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला. निवडणुकीतील आपली भुमिका मांडताना प्रामुख्याने नगर औद्योगिक वसाहतीच्या प्रशनांवर त्यांनी भाष्य केले.
आपल्या भाषणात डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, नगर औद्योगिक वसाहतीचा मोठा दर्जा होता. मोठमोठे उद्योग या औद्योगिक वसाहतीत सुरु होते. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांनीच युनियनच्या नावाखाली या औद्योगिक वसाहतीत दहशत निर्माण केल्याने नुसते उद्योजकच नाही तर उद्योगही निघुन गेले त्यामुळे रोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. सर्व पद असूनही औद्योगिक वसाहतीच्या विकासाचे कोणतेही मुद्दे लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी मांडले नाहीत अशी टिका करुन त्यांनी सांगितले की, असलेल्या शिक्षण संस्थांमधून आज विद्यार्थी बाहेर पडत असले तरी, रोजगारासाठी बाहेर जावे लागत आहे. या औद्योगिक वसाहतीत कोणते उद्योग यावेत याचा आराखडा तयार करुन भविष्यात आपण या औद्योगिक वसाहतीचा दर्जा पुन्हा निर्माण करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.























































