
सामना प्रतिनिधी । नगर
मेहनत व जिद्दीच्या जोरावर यश साध्य करता येते असे आपण एक ना अनेक व्यक्ती अनुभवतो. कोल्हाटी समाजातून पुढे आलेली अशी व्यक्ती म्हणजे अमित काळे. नगरच्या अभिनेत्री, लावणीसम्राज्ञी राजश्री काळे हा त्यांचा मुलगा अमित याने यावर्षी यूपीएससी मध्ये 212 रँक मिळवून कलेक्टर होण्याचे स्वप्न साकार केले.
कोल्हाटी समाज शिक्षणापासून दूर, मात्र पोटाला चिमटे बसले तरी पोराला शिकवायचं हे मातापित्यांचे कर्तव्य. आपला मुलगा शिकावा म्हणून राजश्री काळे यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, याकरता पुण्यामध्ये शिक्षणासाठी ठेवले मुलाने सुद्धा अतिशय मेहनतीने व जिद्दीने हे यश संपादन केले. कलेक्टर व्हायचे अशी त्याने मनामध्ये खूणगाठ बांधली होती व त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याची आई त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. त्याने यंदा यूपीएससी परीक्षेत यश मिळवले ही एक अभिमानाची बाब आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, राजश्री काळे यांचा तो मुलगा आहे. शालेय शिक्षण त्यांनी पुण्याच्या मुक्तांगण येथे घेतले, बारावीपर्यंत शिक्षण त्याने आपटे महाविद्यालयात घेतले व त्यानंतर व्हीआयटी कॉलेजमधून मेकॅनिकलची पदवी त्यांनी संपादन केली. सुरुवातीपासूनच अभ्यास व वाचनाची आवड, मोठा मित्र परिवार त्याने आपल्या शालेय जीवनापासून जोडला.
आपल्याला कलेक्टर व्हायचे आहे असे अमितने घरच्यांना आधीच सांगितले होते. त्याच्या स्वप्नपूर्तीच्या प्रयत्नात आईने काही कमी पडू नये यासाठी काळजी घेतली. आईलासुद्धा आपला मुलगा चांगला शिकावा, मोठा व्हावा व कलेक्टर व्हावा असेही वाटत होते. पदवी घेतल्यानंतर त्याने यूपीएससीचा अभ्यास सुरू केला 2016साली त्याने पहिली परीक्षा दिली. यामध्ये तो उत्तीर्ण झाला त्यानंतर 2017 मध्ये त्याने पुन्हा ही परीक्षा दिली त्या वेळेस त्याला 812 वा रँक मिळाला. मात्र तो मिळाल्यावर आपण कलेक्टर पदाला पात्र होणार नाही आपण कुठे कमी पडलो, असे त्याला सातत्याने वाटत होते. पण निराश न होता त्याने पुन्हा ही परीक्षा द्यायची असे म्हणून अभ्यास सुरू केला व तो उत्तीर्ण झाला व त्याचे कलेक्टर होण्याचे स्वप्न आता साकार झाले आहे.
घरामध्ये मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण नसताना फक्त जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर अमितने यश गाठले ज्योती व मेहनती मुळेच त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंदर्भात राजश्री काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुलाचे कौतुक करून त्याची मेहनत व जिद्दने अभ्यास केला आणि त्याने माझे व त्याचे हे स्वप्न साकार केले यासारखा दुसरा आनंद नाही असेही त्या म्हणाल्या.























































