
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
‘केंद्र आणि राज्य सरकारने दबावतंत्राचे राजकारण केले असते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील निम्मे लोक भाजपमध्ये आले असते. मात्र, आम्ही असे राजकारण केले नाही. मात्र, भाजपच्या कामावर फिदा होऊन जे लोक स्वतःच्या मर्जीने येत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे,’ असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे काँग्रेस नेते तथा सहकारशिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या भाजपप्रवेशाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी काळे यांच्यासमवेत पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडूशेठ घोडके, माजी नगराध्यक्षा सुरेखा पवार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. तर, जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकरभैया देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, आमदार प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, शहाजी पाटील, धनाजी साठे, माढय़ाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वच पक्षांत काही लोक चांगले काम करतात. त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर आम्ही त्यांना प्रवेश देतो. गेली साडेचार वर्षे आम्ही राज्यात काम करीत असून, कधीही कामे करताना स्वकीय व विरोधक अशी तुलना केली नाही. महायुतीच्या सरकारचे काम पाहून अन्य पक्षातील नेते आकर्षित होत आहेत. सोलापूर जिह्यातूनही रणजितसिंह मोहिते-पाटील पक्षात आले; पण त्यांनी स्वतःसाठी काही मागितले नाही. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाची त्यांची मागणी आहे. कल्याणराव काळे यांनी शेतकऱयांचे प्रश्न, पाणीविषयक समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
राज्य सरकारने साडेचार वर्षांच्या काळात विकासाची अनेक कामे केली आहेत. टेंभू, म्हैसाळ, उरमोडी यांसह अनेक सिंचन प्रकल्पांना निधी दिल्यामुळे ही कामे प्रगतिपथावर आहेत. शेतकऱयांना ‘एफआरपी’ची रक्कम मिळावी म्हणून कारखान्यांसाठी पॅकेज दिले. साखरेची किमान किंमत निश्चित केली आहे. इथेनॉलनिर्मितीला चालना दिली जात आहे. शरद पवार हे 10 वर्षे केंद्रात मंत्री असतानाही त्यांना या क्षेत्रात जे करता आले नाही, ते मोदी सरकारने करून दाखविले आहे. टीमचा कॅप्टन खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि खेळ सोडून पळून गेल्यावर जशी स्थिती होते, तशीच अवस्था आज राष्ट्रवादीची माढय़ात झाल्याचा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, कल्याणराव काळे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार प्रशांत परिचारक यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर विजय चौगुले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शैला गोडसे, विजयराज डोंगरे, राजकुमार पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, शहराध्यक्ष संजय वाईकर, समाधान काळे, दिनकर मोरे, उमेश परिचारक, श्रीकांत देशमुख, वसंतराव देशमुख, दिलीप घाडगे, दादासाहेब साठे, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व नेते उपस्थित होते. सुधाकर कवडे व अविनाश कोळी यांनी सूत्रसंचालन केले





























































