मनोहर पर्रिकर यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

लोकसभा निवडणूकांच्या प्रचारसभेसाठी गोव्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना ऊजाळा दिला. पर्रिकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सदैव गोव्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्रिकरांनी गोव्यात विकासाचा मार्ग तयार केला त्यावरून गोव्याला पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्यावेळी मदत हवी असेल त्यावेळी आपण तुमच्या सोबत आहोत असे सांगत खाण प्रश्न गोमंतकीयांना अपेक्षित असलेल्या पद्धतीने सोडवला जाईल, असे आश्वासनही मोदी यांनी दिले. बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात कोकणीतून केली. ‘सगळ्यां गोयकारांक मायेमोगाचो येवकार’ असे उद्गार काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला. शेवटी भाषण संपवतानाही ते कोकणीतून बोलले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कारकिर्दीत शहिदांसाठी मानवीय दृष्टीकोनातून निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शहीद जवानांचे पार्थिव आज घरापर्यंत येत आहे. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षणमंत्री होते. या शवपेटयांचे काँग्रेसने भांडवल केले. अशा गोष्टीत काँग्रेस माहीर आहे, असा आरोप मोदी यांनी केला. देश लुटण्यासाठी काँग्रेस पुन्हा एकदा संधी शोधत आहे. आता महागठबंधन करून देश लुटायची तयारी ते करत आहेत. त्यामुळे काँग्रेसपासून सावध रहा, असे आवाहनही त्यांनी केले. आपण चौकीदार असून काँग्रेसला देश लुटू देणार नाही. आपण सर्वांनीच चौकीदार बनून देश राखायला हवा, वाढवायला हवा, असे त्यांनी सांगितले. वातावरणात प्रचंड उकाडा असूनही सभेला मोठय़ा प्रमाणात नागरिक उपस्थित होते. त्यात महिला व युवकांची संख्या लक्षणीय होती.

काँग्रेसच्या सत्ताकाळात देशाची प्रचंड लूट झाली. काँग्रेस पक्षाने संरक्षण मंत्रायलयातही भ्रष्टाचार केला. बोफोर्समधून दलालीचे पैसे कमवले आणि क्वात्रोचीला पळून जाण्यास मदत केली. दशकभराच्या कालावधीत लष्कराला तोफा मिळू शकल्या नाहीत. राफेल डीलमध्येही काँग्रेसचे दलाल आले आणि राफेल करार रखडला. 2014 मध्ये राफेल डीलची फाईलच काँग्रेसने बंद करून टाकली. हेलिकॉप्टर घोटाळ्यातही काँग्रेसने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, असा आरोप मोदी यांनी केला.

गोव्यातील खाणबंदीबाबत लोकांना असलेली चिंता आपण जाणतो. ही समस्या कशी सोडवावी यावर विचार सुरू आहे. गोव्यातील लोकांशी आपण दिल्लीत बोललो. एका बाजूने सर्वोच्च न्यायालय आहे. त्यामुळे यावर कसा तोडगा काढावा याचा विचार करणार असल्याचे मोदी म्हणाले. कायदेशीर विचार करून व गोव्याचा सल्ला घेऊन काम केले जाणार आहे. खाणबंदीची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मच्छीमारांसाठी आवश्यक ती पावले उचलणार आहोत. त्यांच्यासाठी वेगळय़ा सुविधा, किसान कार्डनुसार शेतकऱ्यांना सुविधा मिळतात तशा सुविधा मच्छीमारांना मिळणार, असेही ते म्हणाले.

केंद्रातील भाजप सत्ताकाळात छोटय़ा राज्यांचा भरपूर विकास झाला. गोवा त्यामध्ये सर्वांत पुढे आहे. गोव्याने विकासाचे मॉडेल तयार केले. पर्रीकरांनी विकासाला आकार दिला. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हा विकास पुढे नेणार असा आपल्याला विश्वास आहे. गोव्याच्या विकासासाठी व रोजगारासाठी भाजपने निष्ठेने काम केले. पर्यटन वाढीसाठी पाच वर्षात खूप काम केले. ई व्हीसा, ऑनलाईन व्हीसा यामुळे पर्यटनात मोठी वाढ झाली. साधनसुविध मजबूत बनविण्यासाठी खूप काम केले. मांडवी पूल, मोपा विमानतळ, दाबोळीचे काम, झुवारी पूल असे अनेक प्रकल्प दिले. पणजीत स्मार्टसिटीअंतर्गत काम केले. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी काम केले, असे मोदी म्हणाले.

काँग्रेसचा हात पुन्हा देशाची तिजोरी साफ करणार
काँग्रेसने क्वात्रोचीला पळायला मदत केली तशी हेलिकॉप्टर दलालांना पळायलाही मदत केली. मात्र, चौकीदार येणार हे त्यांना माहित नव्हते. या दलालांना आम्ही पाताळातूनही हुडकून काढू. काँग्रेसवाले हात सफाईत पटाईत आहेत. काँग्रेसच्या हातापासून सावध रहा. हा हात पुन्हा देशाची तिजोरी साफ करण्याचेच काम करेल, असा इशाराही मोदींनी दिला.भाजपने सत्तेचा उपयोग देश मजबूत बनविण्यासाठी केला, तर काँग्रेसने सत्तेचा उपयोग देश लुटण्यासाठी केला. 15 वर्षानंतर मध्य प्रदेशात काँग्रेसला सत्ता मिळाली. आज तिथेही लुटालूट सुरू आहे. या लुटीच्या नोटांची धरपकड केली आहे. गोव्याच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा भाजपलाच सत्ता द्या, आपण देशाच्या सुरक्षेसाठी चौकीदाराची भूमिका निभावणार, असेही मोदी म्हणाले.

पर्रिकरांनी गोव्यासाठी, देशासाठी समर्पण केले
माजी मुख्यमंत्री व महान नेते मनोहर पर्रिकर यांनी गोव्यासाठी व देशासाठी समर्पित भावनेने काम केले. गोव्यात आपण अनेकवेळा आलो. मात्र, गोव्यातली ही पहिलीच भेट आहे, ज्यावेळी पर्रिकर आपल्यात नाहीत. ते आपल्यात नाहीत पण त्यांचे काम, त्यांचे संस्कार आमच्यात आहेत. प्रामाणिकपणे जनहितासाठी कसे काम करावे हे पर्रिकरांनी दाखवून दिले. सर्वसामान्य घटकांसाठी त्यांनी खूप काम केले. सबका साथ सबका विकास हे त्यांनी दाखवून दिले. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करायचे आहे, असे ते म्हणाले. संरक्षणमंत्री असताना पर्रिकरांनी सैनिकांसाठी खूप काम केले. राष्ट्रासाठी त्यांनी जे समर्पित भावनेने काम केले त्याची तुलना होऊ शकत नाही. सर्जिकल स्ट्राईकने जगाला आपली ताकद दाखवून दिली. आपणही दहशतवाद्यांना घरात घुसून मारू शकतो हे जगाला दाखवून दिले. पर्रिकर यांच्या सोबतीने संरक्षण मंत्रालयाला सरकारने एक वेगळी दिशा दाखविली, असा गौरवपूर्ण उल्लेख मोदींनी केला