काँग्रेसचा जाहीरनामा मुंबईकरांच्या घरांचे स्वप्न भंग करणारा; आशीष शेलार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआरझेड-2 मध्ये शिथिलता आणून मुंबईतल्या झोपडपट्टीतील सुमारे 13 लाख रहिवाशांना, गृहनिर्माण सोसायटय़ांमधील 3 लाख 53 हजार जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना दिलासा दिला आहे. पण काँग्रेसने किनारपट्टीचे संरक्षण करण्याच्या नावाखाली सीआरझेड- 2 मध्ये फेरबदल करण्याचा मनसुबा निवडणूक जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. यामुळे मुंबईकरांच्या घरांचे स्वप्न भंग होईल, असा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष-आमदार ऍड. आशीष शेलार यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशीष शेलार यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील त्रुटींकडे लक्ष वेधले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील 49 व्या कॉलममधील सातव्या कलमाकडे लक्ष वेधले. ‘एन्व्हार्न्मेंट ऍण्ड क्लायमेट चेंज’ या शीर्षकाखालील कलमांमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, किनाऱ्यांचे संरक्षण करताना सीआरझेड-2 मध्ये करण्यात आलेल्या बदलांमध्ये काँग्रेस फेरबदल करेल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील याच ओळींवर आशीष शेलार यांनी आक्षेप नोंदवला आहे.