झंझावाती प्रचाराचा तिसरा टप्पा; मराठवाडा, विदर्भात उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पालघर, मुंबई, रामटेक, यवतमाळ, औसा, हातकणंगले, गुहागर येथील झंझावाती सभांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे. विदर्भ, मराठवाडय़ात तिसऱया टप्प्यातील प्रचार दौऱयात 12 एप्रिल रोजी बुलढाणा, 13 एप्रिल हिंगोली तर 14 एप्रिल रोजी धाराशीव येथे उद्धव ठाकरे यांची मुलुखमैदान तोफ धडाडणार असून लाखो लाखोंच्या विराट सभांनी विरोधक धोबीपछाड होणार आहेत.

महाराष्ट्रात विदर्भातील पहिला टप्पा आज पार पडल्यानंतर 29 एप्रिलपर्यंत उर्वरित तीन टप्प्यांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. यामध्ये उर्वरित विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई तसेच ठाण्यात या निवडणुका होणार आहेत. या पुढील टप्प्यांतील निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू होणार आहे. तिसऱया टप्प्यातील प्रचारात उद्धव ठाकरे यांची 12 एप्रिल रोजी बुलढाणामधील खामगावच्या जे. यू. कॉलेज मैदान येथे सायंकाळी 6 वाजता सभा होणार आहे. 13 एप्रिल रोजी हिंगोली येथील हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी 6 वाजता सभा होणार आहे. तर 14 एप्रिल रोजी धाराशीव येथील जुना उपळा रोड येथे सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.