
>> विद्या कुलकर्णी
महाराष्ठ्रात सर्वत्र आढळणारा तांबट पक्षी. मुंबईचा हा अधिकृत पक्षी आहे.
आजचा आपला पक्षी आहे तांबट or coppersmith barbet! मुंबईकरांना जर विचारले की, ‘‘तुम्ही तांबट पक्षी बघितला आहे का?’’ तर कदाचित त्यांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह दिसेल, परंतु तांब्याच्या भांडय़ावर हातोडय़ाने घण मारल्यासारखा ‘टकटक’ आवाज ऐकलात का? तर त्याचे उत्तर नक्कीच होकारार्थी मिळेल. या पक्ष्याच्या आवाजात दूरवर पोहोचण्याचा गुण आहे. कधी कधी आपण एखाद्या वडाच्या झाडाखाली उभे असताना झाडावरून तांबटाचा आवाज येत असतो.आपल्याला वाटते की, हा आवाज खूप लांबून येतोय.वास्तविक हिरव्या झाडांमध्ये मिळून मिसळून जाणारा तांबट आपल्यापासून अगदी जवळ असतो. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही या पक्ष्याचे वर्षानुवर्षे अस्तित्व टिकून आहे. म्हणूनच ‘2011’ मध्ये ‘कॉपरस्मिथ बार्बेट’ला मुंबईचा अधिकृत पक्षी असे घोषित करण्यात आले.
बार्बेट, उष्णकटिबंधीय पक्ष्यांच्या जवळपास 80 प्रजाती आहेत. त्यांना ‘बार्बेट’ हे नाव त्यांच्या चोचीच्या तळाशी असलेल्या राठ केसांमुळे (मिशीसारखे) मिळाले आहे. हे मोठय़ा डोक्याचे व लहान शेपटीचे पक्षी आहेत. साधारणत- 9 – 30 सें. मी. लांबीचे, हिरव्या किंवा तपकिरी रंगांचे व त्यावर चमकदार किंवा पांढऱया रंगाचे फटकारे असलेले हे पक्षी आहेत. या लेखात आपण तांबट बार्बेटच्या चार प्रजातींची माहिती जाणून घेऊया. तांबट हा प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. हा तांबूस रंगाचा असून साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. अतिशय दाट झाडीत याचे वास्तव्य असल्याने सहजपणे दिसत नाही. तांब्याच्या भांडय़ावर ठोके देणाऱया तांबटाचा जसा ‘टक टक’ आवाज येतो तसा एकसुरी आवाज हे पक्षी झाडावर बसून करतात. एका मिनिटात 108 – 120 वेळा ‘टक टक’ करतात व वेगवेगळ्या 204 सुरांमध्ये करू शकतात. या पक्ष्यांच्या गळ्यावर आणि डोळ्याभोवती पिवळा रंग असतो. खालील बाजूस पांढऱया व हिरव्या रंगांच्या रेघा असतात. छाती, कपाळावर लाल रंगाची पिसे असतात. काळी मजबूत चोच आणि तळाशी मिश्या असतात. नर व मादी दोघेही सारखेच दिसतात.
तपकिरी डोक्याचा तांबट – या पक्ष्याचे डोके, छाती, कंठ तपकिरी रंगाचे असतात.
पांढऱया गालाचा तांबट – पक्ष्याच्या डोळ्यांची वरची कडा आणि गाल हे पांढऱया रंगाचे असतात.
किरमिजी रंगाचा तांबट – पक्ष्याच्या गळ्यावर व छातीवर किरमिजी रंग असतो व त्यामागे अनुक्रमे काळा आणि निळा पट्टा असतो.
तांबट पक्ष्याचे वास्तव्य हिंदुस्थानी उपखंड व दक्षिण-पूर्व आशियातील काही भागांत आढळते. हा येथील कायमचा रहिवासी आहे. शेतात, बागेतील वृक्षांवर, विरळ झाडीच्या प्रदेशात ते आढळतात. हिमालयात हे पक्षी तीन हजार फुटांपर्यंत आढळतात. वठलेल्या झाडांवर वा झाडांच्या खोडांवर हे पक्षी पोकळी करून राहतात. अगदी क्वचितच फळांनी भरलेल्या झाडांवर इतर पक्ष्यांमध्ये सामील होतो. यांना सकाळी सूर्याचे ऊन अंगावर घ्यावयास फार आवडते व त्यासाठी ते झाडाच्या उंच फांदीच्या टोकावर बसतात. वड, पिंपळ, अंजीर, जांभूळ अशा झाडांवर हे पक्षी आढळून येतात. या पक्ष्याच्या आहारात प्रामुख्याने फळांचा समावेश असतो. त्यातही वड – पिंपळाची फळ, ठराविक फुलांच्या पाकळ्या, ठरावीक कीटकही खातो. तांबट शरीराच्या दीड ते तीनपट फलाहार करतो असे आढळून येते.
फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत तांबट पक्ष्यांचा प्रजननाचा ऋतू असतो. तांबट पक्ष्याची जोडी आपले घरटे एका ठराविक उंचीवरील आडव्या फांदीवर करते असे आढळून येते. मादी एकावेळी तीन-चार अंडी घालते. अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी आळीपाळीने करतात.
गेल्या काही सप्ताहांपासूनचा हा आपला प्रवास मी खूप समरसून जगते आहे. आशा आहे, तुम्हीसुद्धा या पक्ष्यांच्या जगात रममाण होत असाल.

























































