
सामना प्रतिनिधी । मुंबई
कोपरी येथील उड्डाणपुलाला तडे जाऊन त्याच्या प्लॅस्टरचा काही भाग रेल्वे रुळावर कोसळल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली. त्यानंतर ठाण्यातील पुलांचे आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांकडून ऑडिट केले जाणार आहे. त्यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी नुकतीच आयआयटीच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली.
रोज लाखो लोकांची आणि शेकडो बसेसची वर्दळ असलेला ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटीस पूल, कळवा खाडीवरील पूल आणि मुंब्रा स्थानकावरील उड्डाणपुलाचे ऑडिट आयआयटी मुंबईकडून केले जाणार आहे. हे पूल चांगल्या स्थितीत दिसत असले तरी त्यांना काही ठिकाणी तडे गेल्याने त्यांची मजबुती किती आहे हे जाणून घेण्यासाठी हे ऑडिट करण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेतला आहे.
कोपरी पुलाला तडे गेल्याबद्दल अनेक नागरिकांनी ठाणे पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या पण काहींच्या मते या पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने त्याचे प्लॅस्टर ढिले झाले आहे. मुंब्रा येथील पुलाखालून सतत रेल्वेची वाहतूक सुरू असल्याने त्यामुळेही पुलाला हादरे बसून तो कमकुवत होऊ शकतो असा अधिकार्यांचा अंदाज आहे.



























































