56 वा राज्य मराठी चित्रपट महोत्सव; श्रीनिवास पोकळे, अमन कांबळे ठरले सर्वोत्कृष्ट बालकलाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकारांचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ) आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

घोषित पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदिशाळा), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या), उत्कृष्ट ध्वनिमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट वेशभूषासाठी चैत्राली गुप्ते (एक सांगायचंय अनसेड हार्मोनी), उत्कृष्ट रंगभूषासाठी विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

एकूण 66 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. हे पुरस्कार 26 मे 2019 रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येतील.

यांच्यात रंगणार चुरस
अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा आणि डॉ. काशीनाथ घाणेकर, फायरब्रँड, बंदिशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचंय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे.