गिरीश महाजनांचे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील सध्या काँग्रेसमध्येच राहणार असून लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचे भाजपमध्ये स्वागत आहे. मात्र, ते सध्या भाजपत प्रवेश करणार नसून लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ते याबाबत निर्णय घेणार आहेत, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.

सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा रंगली होती. नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विखेपाटील भाजपत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र,विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही.राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार असून ते भाजपत प्रवेश करणार नसल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले. आपण भाजपमध्ये प्रवेश केला ही आपली वैयक्तिक बाब आहे. त्याच्याशी राधाकृष्ण यांचा संबंध नसून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत सुजय यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राधाकृष्ण भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेतील असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.