
सामना प्रतिनिधी, परळी वैद्यनाथ
मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या प्रकट दिनानिमित्त अर्थात रामनवमीच्या निमित्ताने प्रभू वैद्यनाथाच्या पावन नगरीत विविध मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शहरात असलेल्या काळा राम, गोरा राम, सावळा राम मंदिरात भक्त सकाळपासूनच उपस्थित राहू लागले होते. दुपारी 12 वाजता रामजन्म गुलाल उधळून साजरा करण्यात आला.
रामनावमीसाठी राम मंदिरांना रंगरंगोटी करून फुलांनी सजविण्यात आले होते. गोरा राम मंदिरात ह.भ.प.मनोहरदेव जोशी यांचे आध्यात्मिक रामायणाचे आयोजन करण्यात आले होते तर काळा राम मंदिरात ह.भ.प.रवींद्र वेताळ यांच्या सुमधुर वाणीतून रामकथा संपन्न झाली. सावळा राम मंदिरातही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. ‘सीताकांत स्मरणम जय राम’, ‘राजा रामचंद्र भगवान की जय’ अशा राम नाम जयघोषाने राम मंदिरे गजबजून गेली होती.























































