
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाचे प्रदर्शन निवडणूक आयोगाने रोखल्यानंतर आता काँग्रेसने मोदींवरील वेबसिरीजविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ‘मोदी: जर्नी ऑफ कॉमन मॅन या वेबसिरीजमधून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून आचार संहितेचा भंग होत आहे. त्यामुळे या वेबसिरीजवर बंदी घालावी’ अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
एरॉस नाऊ वरील मोदी: जर्नी ऑफ कॉमन मॅन ही वेबसिरीज 3 एप्रिललाच प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमध्ये गायक व अभिनेता फैझल खान हा लहानपणींच्या मोदींची भूमिका करत आहे तर आशिष शर्मा या अभिनेत्याने तरुणपणीचे मोदी साकारले आहेत. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते महेश ठाकूर यांनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा काळ रंगवला आहे. लेखक व सेन्सॉर बोर्डचे सदस्य मिहीर भुटा आणि राधिका आनंद यांनी या वेबसिरीजची कथा लिहली आहे.



























































