जम्मू-श्रीनगर हायवेवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अॅलर्ट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. हा हल्ला मोटारसायकलवरुन होणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. हल्ल्याबाबतच्या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, जम्मू-श्रीनगर हायवेवर रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

14 फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये लष्कराच्या ताफ्यातील बसवर स्फोटकांनी भरलेली कार धडकावून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. तसाच हल्ला रविवारी सकाळी होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. मात्र या हल्ल्यात कारऐवजी मोटारसायकलचा वापर केला जाणार आहे. रविवारी सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान हा मोटारसायकलचा स्फोट घडवून हल्ला होण्याची माहिती मिळाली होती. श्रीनगरमधील बटवारा आणि टॅट्टू ग्राऊंड परिसर हा अतिसंवेदनशील असून याठिकाणी बॉम्बस्फोट केला जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवानांना वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी सैन्यदलाच्या वाहनांचे ताफे जाणार होते. मात्र गुप्तचर यंत्रणांच्या अॅलर्टमुळे रविवारी सकाळी 9 वाजण्याअगोदर सैन्यदलांच्या वाहनांचे ताफ्याची वाहतूक थांबवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत हायवेवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या हायवेवर मोटारसायकल येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे.

दहशतवाद्यांकडून सैन्यदलाच्या वाहनांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ल्याचे  कट रचले जात आहेत. गेल्या दोन महिन्यात  अशाप्रकारचे दोन हल्ले झाले आहेत. पुलवामामध्ये घडवलेल्या कार स्फोटात CRPFचे 40 जवान शहीद झाले होते. तर बनिहालजवळ देखील CRPFच्या ताफ्याजवळ पुन्हा कारचा स्फोट घडवला होता. मात्र सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नव्हती.