महानिर्मितीच्या औष्णिक वीज प्रकल्पांचे वय झाले, वीजनिर्मितीवर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्रसाठी वीजनिर्मिती करण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या महानिर्मितीचे 1470 मेगावॅट क्षमतेच्या सात वीज संचाचे वय झाल्याचे समोर आले आहे. तसेच 432 मेगावॅटच्या चार संचांचेही आयुष्य संपत आले आहे. त्यामुळे येथील वीजनिर्मिती कोणत्याही क्षणी ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच वय झाल्यानंतरही हे वीज संच चालवले जात असल्याने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा येत आहेत. प्रदूषणातही वाढ होत आहे.

महानिर्मितीची एकूण वीजनिर्मिती क्षमता 13 हजार मेगावॅट आहे, तर औष्णिक प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता साडेअकरा हजार मेगावॅट आहे. त्यामध्ये भुसावळ, खापरखेडा, पारस, नाशिक, कोराडी, चंद्रपूर या वीज केंद्रांमध्ये एकूण 28 वीज संच आहेत. त्यापैकी सध्या भुसावळचा संच क्रमांक 3, खापरखेडा 1,नाशिक येथील संच क्रमांक 3, 4, 5, कोराडी युनिट क्रमांक 6, 7 यांना 30 वर्षांहून अधिक कालावधी उलटला आहे. एखाद्या वीज संचातून वीजनिर्मिती सुरू झाल्यानंतर 30-35 वर्षे पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होते, मात्र सध्या वय झालेल्या या वीज संचांमध्ये डागडुजी करून वीजनिर्मिती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे येथून वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने होत नाही. तसेच जुन्या वीज संचामधून 150 पीपीएमपर्यंत धुलीकणाचे प्रमाण हवेत सोडले जात आहे, तर हेच प्रमाण नवीन वीज संचात केवळ 100 पीपएम एवढे कमी आहे.

कोळशाची गरज भागेना
सध्या वय झालेले सर्व वीज संच सब क्रिटिकल तंत्रज्ञानाच्या आधारावर उभारलेले आहेत. येथून एक युनिट वीजनिर्मिती करण्यासाठी 750-800 ग्रॅम कोळसा लागतो. तर नवीन सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानाच्या आधारे उभारलेल्या औष्णिक वीज प्रकल्पातून एक युनिट विजेची निर्मितीसाठी केवळ पाचशे-सहाशे ग्रॅम कोळसा लागतो. वय झालेल्या या वीज संचांना जादा कोळसा लागत असल्याने महानिर्मितीच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

उरणच्या गॅसवरील चार संचांनीही 34 वर्षांचा टप्पा गाठला
औष्णिक वीज संचाप्रमाणेच गॅसवरील वीज संचाचे आयुष्य 35 वर्षांचे आहे. त्यानुसार उरण येथील गॅसवरील वीज प्रकल्पातील 432 मेगावॅट क्षमतेचे चार वीज संचांनीही 34 वर्षांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे वर्षभरात या संचाचे आयुष्य संपणार आहे.
वीज संच वीजनिर्मिती क्षमता उभारणी (मेगावॅट) वर्ष
भुसावळ – 3 210 – 1982
खापरखेडा-1 210 – 1989
नाशिक-3 210 – 1979
नाशिक-4 210 – 1980
नाशिक-5 210 – 1981
कोराडी-6 210 – 1978
कोराडी-7 210 – 1983