
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांची 3 कोटी 68 लाख रुपयांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी जप्ती आणली. या संपत्तीमध्ये चौटाला यांचा फ्लॅट, प्लॉट आणि जमिनीचाही समावेश आहे. चौटाला यांची ही संपत्ती नवी दिल्ली, पंचकुला आणि सिरसा येथे आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमविल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना जानेवारी 2013 साली जेबीटी घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 7 वर्षांची आणि कट रचल्याप्रकरणी दोषी ठरल्याने 10 वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली होती. सध्या ते तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आजारपणामुळे आपली शिक्षा कमी व्हावी यासाठी चौटाला यांनी तिहार कारागृह व्यवस्थापनाकडे अर्ज दिला होता. व्यवस्थापनाने हा अर्ज दिल्ली सरकारच्या कमिटीकडे पाठवला होता. या कमिटीने त्यांची शिक्षा कमी करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
























































