मशिदीत महिलांच्या प्रवेशाला प्रतिबंध का?-सर्वोच्च न्यायालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme_court_295

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

स्वतःच्या घरात कुणाला जायचे असेल तर दुसऱया कुणाच्या परवानगीची गरजच काय, मंदिर किंवा मशिदी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत का, जिथे जाताना त्यांची परवानगी घ्यावी लागते, अशी विचारणा करत केंद्र सरकारने यावर आपले मत स्पष्ट करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. तसेच केंद्राला चार आठवडय़ांत उत्तर देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

मशिदीत प्रवेशाबाबत पुण्यातील यस्मीन झुबेर अहमद पिरझादे आणि झुबेर अहमद नझीर अहमद पिरझादे या मुस्लिम दांपत्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सवाल केला आहे. याचिकाकर्त्या दांपत्याने याचिकेत म्हटले, हिंदुस्थानात मशिदींमध्ये महिलांना नमाज पढायला परवानगी दिली जात नाही हे केवळ चुकीचेच नव्हे, तर कायद्याच्या विरुद्ध आहे. केंद्रासोबतच कोर्टाने कायदा आणि न्याय मंत्रालय, अल्पसंख्याकांसाठीचे मंत्रालय, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड आणि सेंट्रल वक्फ काऊन्सिल यांनाही नोटिसा बजावून याबाबतचे मत मागवले आहे.

‘शबरीमाला’ निकालाच्या पार्श्वभूमीवर सुनावणी

यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना मशिदीतील महिला प्रवेशाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत; परंतु काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने शबरीमाला मंदिर महिला प्रवेशाबाबत निकाल दिला आहे. त्यामुळे आम्ही या याचिकेची सुनावणी घेत आहोत, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.

याचिकेत काय म्हटले आहे?

कायद्यापुढील समानता आणि जीवनहक्क व जगण्याचे स्वातंत्र्य या कायदेशीर कलमांचा आधार घेतला तर महिलांना मशिदीत येण्यास मज्जाव करणे हा कायदेशीर गुन्हा मानला गेला पाहिजे. कुराण किंवा इतर कोणत्याही धार्मिक ग्रंथांमध्ये महिला आणि पुरुष एकत्र नमाज पढू शकत नाही, असेही म्हटलेले नाही. पुरुषांप्रमाणे महिलांनाही आपल्या धर्मसमजुतीप्रमाणे नमाज पढण्याचा अधिकार आहे.

न्यायालय काय म्हणते?

मशिदीत किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवेश करणे हा गुन्हा नाही. मग महिलांना प्रवेश करताना रोखले का जाते? आणि प्रवेश करण्यासाठी पोलिसांची मदत का घेतली जाते? स्वतःच्या घरात प्रवेश करताना कोणी पोलिसांची मदत घेते का, असा प्रश्न न्यायालयाने केला.

सुनावणी होणार याचा आनंद

गेली चार वर्षे महिलांना मशिदीमध्ये प्रवेशासाठी आमचा लढा सुरू होता. स्थानिक मशिदींनी आम्हाला प्रवेश नाकारला. अखेर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. आता यावर सुनावणी होणार आहे याचा आम्हाला आनंद असल्याची प्रतिक्रिया पुण्याचे झुबेर पिरजादे यांनी दिली आहे. झुबेर हे रिअल इस्टेट डीलर आहेत.