
सामना प्रतिनिधी । बीड
मतदान केंद्रावर निवडणूक सामान आणि कर्मचारी घेऊन जात असलेल्या बसला अपघात झाला. बस रस्त्याच्या खाली गेली आणि विजेच्या खब्यावर धडकली. मात्र सुदैवाने ती न उलटल्याने बसमधील 50 कर्मचारी बालंबाल बचावले.
गुरूवारी मतदान असल्याने बुधवारी दिवसभर प्रशासनाची धावपळ सुरू होती. तर अधिकारी, कर्मचारी बुधवारी रात्रीच केंद्राच्या ठिकाणी मुक्कामी जाण्याच्या तयारी होते. आष्टी येथून बस क्र. एमएच 20 बीएल 2685 तालुक्यातील विविध केंद्रांवर कर्मचाऱ्यांना सोडत होती. डोईठाणा जवळ पाण्याचे टँकर घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक बसला आडवा आला. यामुळे बस चालकाने बस रस्त्याच्या खाली घातली. सुदैवाने बस पलटी न झाल्याने बसमधील जवळपास 50 कर्मचारी बालंबाल बचावले. यातील कर्मचाऱ्यांना किरकोळ खरचटल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशासनाला याबाबत कळविण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर जागेवरच सोडून पलायन केले.






















































