देशभरातील 13 राज्यांसह महाराष्ट्रात आज मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यासाठी आज गुरुवारी देशभरातील 13 राज्यांतील 97 मतदारसंघांत मतदान होत आहे. दुसऱया टप्प्यात महाराष्ट्रातील 10 मतदारसंघांचा समावेश असून 1 कोटी 85 लाख मतदार 179 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत. यामध्ये सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांसह आनंदराव अडसूळ, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, डॉ. प्रीतम मुंडे अशा दिग्गजांचा समावेश आहे.

सतराव्या लोकसभेसाठी राज्यात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यासाठी बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद (धाराशीव), लातूर आणि सोलापूर अशा दहा मतदारसंघांत उद्या मतदान होत आहे. दहाही ठिकाणी चुरशीची लढत असल्याने मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. ही निवडणूक शेवटची असल्याचे जाहीर करून काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले आहे, तर माजी खासदार प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रथमच सोलापूरमधून निवडणूक लढवत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सलग दुसऱऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांना नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव पाटील-चिखलीकर यांचे आव्हान आहे. बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे तर अमरावतीत माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि युवा स्वाभिमानीच्या नवनीत कौर राणा यांच्यात लढत आहेत.

सर्वाधिक 36 उमेदवार बीडमध्ये

दुसऱया टप्प्यात सर्वाधिक 36 उमेदवार बीडमध्ये तर सर्वात कमी म्हणजे 10 उमेदवार लातूर लोकसभा मतदारसंघात आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांत जेमतेम 60 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. आता दुसऱया टप्प्यातील निवडणुकीला मतदार कसा प्रतिसाद देतात याविषयी उत्सुकता आहे.

दुसऱया टप्प्यातील लढती

बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना), डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी), बळीराम सिरस्वार (वंचित बहुजन आघाडी)
अकोला – संजय धोत्रे (भाजप), हिदायतुल्ला पटेल (काँग्रेस), प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), भाई बी. सी. कांबळे (बहुजन समाज पार्टी)
अमरावती – आनंदराव अडसूळ (शिवसेना), गुणवंत देवपारे (वंचित बहुजन आघाडी)
हिंगोली – हेमंत पाटील (शिवसेना), सुभाषराव वानखेडे (काँग्रेस), मोहन राठोड (वंचित बहुजन आघाडी)
नांदेड – अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव पाटील-चिखलीकर (भाजप)
परभणी – संजय जाधव (शिवसेना), राजेश विटेकर (राष्ट्रवादी), आलमगीर मोहम्मद खान(वंचित बहुजन आघाडी)
बीड – प्रीतम मुंडे (भाजप), बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी), प्रा. विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी)
उस्मानाबाद – (धाराशीव) – ओमराजे निंबाळकर (शिवसेना), राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी), अर्जुन सलगर (वंचित बहुजन आघाडी)
लातूर – सुधाकर शृंगारे (भाजप), मचिलचंद्र कामत (काँग्रेस), राम गारकर (वंचित बहुजन आघाडी)
सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप), सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस), प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)