
सामना ऑनलाईन । मुंबई
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप महाआघाडीला वातावरण अतिशय अनुकूल आहे. शिवसेनेने केलेली लोकहिताची कामे, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा प्रचारातील समन्वय आणि अतिशय नियोजनपूर्ण व आक्रमक प्रचार तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा क्षीण पडलेला प्रचार यामुळे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.
मुंबईतील मध्यवर्ती मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱया दक्षिण -मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी खूप लवकर जाहीर झाल्यामुळे त्यांनी दीड-दोन महिन्यांपूर्वीच प्रचार सुरू करून आघाडी घेतली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांचा नियोजनपूर्ण प्रचार सुरू आहे. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी प्रचारात जबरदस्त आघाडी घेतली आहे. या मतदारसंघातील मतदानासाठी अजून 10 ते 11 दिवसांचा कालावधी आहे. या दिवसांत महायुतीचा प्रचार अधिक नेटाने होणार आहे. या मतदारसंघातील सुशिक्षित विद्यमान खासदार अशी राहुल शेवाळे यांची ओळख आहे.
आघाडीत अंतर्गत नाराजी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघात फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे गायकवाड यांची प्रचाराची मदार काँग्रेस कार्यकर्त्यांवरच आहे, पण काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारात कार्यकर्ते एकदिलाने काम करताना दिसत नाहीत.
प्रमुख लढत शेवाळे आणि गायकवाड यांच्यात
या मतदारसंघात एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले व बहुजन समाज पार्टीचे अहमद शकील सगीर अहमद शेख यांचा समावेश आहे. पण प्रमुख लढत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे व महाघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्यात आहे.
शिवसेनेच्या विकासकामांनाच मिळणार मते
खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पर्यावरण संवर्धन व पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत त्यांनी अनेक मुद्दे संसदेत मांडले आहेत. पाच वर्षांत 850 हून अधिक प्रश्न उपस्थित करणाऱया शेवाळे यांना ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’ म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिमेचा त्यांना नक्कीच फायदा होईल. त्याशिवाय धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा पाठपुरावा केल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे. धारावी-कोळीवाडा सीमांकनाचा प्रश्नही मार्गी लावला आहे. अशा असंख्य कामांचा त्यांना फायदा होणार आहेत. समाजातल्या विविध घटकांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.





























































