
सामना प्रतिनिधी । हिंगोली
लोकसभा क्षेत्रातील उमरखेड वगळता पाच विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी 6 च्या नंतर 76 मतदान केंद्रावर अद्यापही मतदान सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. सायंकाळी 6 पर्यंत 63 टक्के मतदान झाले असुन, एकुण 65 टक्के मतदान होण्याचा अंदाजही जिल्हाधिकार्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या आज गुरुवारी झालेल्या मतदान प्रक्रीयेची माहिती देण्यासाठी सायंकाळी 7 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी रूचशे जयवंशी म्हणाले की, सर्वत्र मतदान प्रक्रीया शांततेत आणि सुरळीत पार पडली आहे. मतदान सुरू होण्यापुर्वी 44 मतदान यंत्र, 19 कंट्रोल युनिट तर 38 व्हीव्हीपॅट मशिन बदलून देण्यात आल्या. तर सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरूवात झाल्यावर 20 मतदान केंद्रावर मतदान यंत्र, 10 ठिकाणी कंट्रोल युनिट व 14 ठिकाणी व्हीव्हीपॅट यंत्र बदलून देण्यात आले आहे. लोकसभा मतदार संघामध्ये कोणत्याही गावात बहिष्कार टाकण्यात आला नसल्याचा दावा जिल्हाधिकार्यांनी केला. तर सायंकाळी 6 वाजेच्या नंतर किनवट विधानसभा क्षेत्रात 17, हदगावमध्ये 16, वसमतमध्ये 13, कळमनुरीत 19 आणी हिंगोलीमध्ये 11 ठिकाणी अद्यापही मतदान सुरू असुन, रात्री 9 वाजेच्या नंतर या 76 ठिकाणचे मतदान संपण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगीतले. या 76 मतदान केंद्रावरील मतदान संपल्यावर मतदानाची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार असल्याचेही जयवंशी म्हणाले.
दरम्यान, सायंकाळी 6 पर्यंत 63 टक्के मतदान झाले असून, 65 टक्के एकुण मतदान होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला. या पत्रकार परिषदेला जिल्हा माहिती अधिकारी अरूण सुर्यवंशी, मुख्याधिकारी रामदास पाटील उपस्थित होते.




























































