अलौकिक श्रीसंतदर्शन : श्रीगोंदवलेकर महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

‘जो निरंतर नाम घेतो, राम त्याचा मालक होतो’ असे सांगत ‘नाम’माहात्म्याचा पुरस्कार करणाऱ्या ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर’ महाराजांविषयीचा हा लेख.

महाराष्ट्रातील अध्यात्ममार्ग विविध संप्रदायांच्या माध्यमातून वृद्धिंगत झालेला आहे. कर्म, भक्ती, ज्ञान आणि योग अशा अनेकविध मार्गांमधून अध्यात्माचा ‘वेलू’ बहरास आल्याचे दिसून येते. आजवर अनेक संतश्रेष्ठांनी रुजविलेल्या संप्रदायांमधून या महाराष्ट्र भूमीवर अध्यात्माचे प्रसन्न व प्रासादिक ‘शिंपण’ घातले गेले आणि पुढेदेखील ही परंपरा जोमाने चालू राहील यात शंकाच नाही. अध्यात्ममार्गामध्ये अनेकविध संप्रदायातील अतिशय महत्त्वाच्या तसेच ‘नाम’माहात्म्याचे वैशिष्टय़ अधोरेखित करणाऱया आणि जनमानसांत आत्मीयतेने रुजविणाऱया ‘नाम’संप्रदायाचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे आणि त्यासोबतच या ‘नाम’संप्रदायाचे कर्तेधर्ते श्री. गणपती रावजी घुगरदरे (कुलकर्णी) अर्थात श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा उल्लेख करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आणि अगत्याचे ठरते.

सातारा जिह्याच्या माण तालुक्यामधील ‘वावरहिरे’ गावामध्ये राहणारे ‘घुगरदरे’ कुटुंबीय हे भगवद्भक्त आणि पंढरीचे वारकरी म्हणून सर्वत्र सुपरिचित होते. रुद्रोपंत घुगरदरे हे वसिष्ठ गोत्री-शुक्ल यजुर्वेदी-देशस्थ ब्राह्मण ‘घुगरदरे’ कुळाचे मूळपुरुष. मात्र काही कारणास्तव रुद्रोपंतांचे पणतू मूळ गाव सोडून जवळच्या चार कोस अंतरावरील ‘गोंदवले’ या गावी राहावयास आले आणि येथील कुलकर्णीपद सांभाळू लागले. पुढे त्यांचे पुत्र लिंगोपंत अंगभूत हुशारीमुळे ‘माण’ जिह्याचे ‘मुख्य कुलकर्णी’ या पदावर रुजू झाले. लिंगोपंत अतिशय प्रामाणिक, परोपकारी आणि नेमस्त स्वभावाचे असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचा ठसा त्यांनी अल्पावधीतच उमटवला, आणि त्यायोगे सरकारने त्यांना काही जमिनी इनाम स्वरूपात दिल्या. पंचक्रोशीतील मंडळी त्यांना ‘लिंगोपंत इनामदार’ म्हणून ओळखू लागली. प्रपंच आणि परमार्थ यांचा सुयोग्य ताळमेळ घालणाऱया, पंढरीची वारी नित्यनेमाने करणाऱया आणि हातातील विहित कामे आटोपल्यावर आग्रहाने ‘नाम’स्मरणात दंग होणाऱया लिंगोपंत इनामदारांना, त्यांच्या प्रापंचिक व पारमार्थिक ऐश्वर्यास शोभेल असा पुत्र लाभला. त्याचे नाव ‘रावजी’ ठेवण्यात आले.

रावजींचे लौकिक शिक्षण पार पडले. लिंगोपंतांनी रावजींना कुलकर्णीपदाच्या कार्याविषयी अवगत करविले असले तरीही रावजींचा कल मात्र व्यवहारापेक्षा अध्यात्माकडेच होता. जन्मापासूनच ते एकांतप्रिय, काहीसे अबोल आणि गंभीर स्वभावाचे होते. बालवयात अन्य लहान मुलांसोबत खेळण्याऐवजी रावजींचा ओढा स्नानसंध्या, गायत्रीजप आणि नामस्मरण यांकडेच असे. अशातच रावजी बारा वर्षांचे असताना, त्यांचा विवाह कलेढोण गावातील नारायणराव वाघमारे इनामदार यांच्या मुलीशी करून देण्यात आला. घुगरदरे कुटुंबाचा उंबरठा ओलांडून आलेली ही वाघमाऱयांची आठेक वर्षांची लेक सासरी आल्यावर ‘गीताबाई’ या नव्या नावाने ओळख निर्माण करती झाली.

लग्नानंतर अवघ्या पाच-सात वर्षांतच गीताबाईंनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली. लिंगोपंतांच्या प्रसिद्ध व्यक्तित्वामुळे घरांत अनेक मान्यवरांचे, पै-पाहुण्यांचे नित्याचे येणे-जाणे असे. येणाऱयांचे आगतस्वागत करणे, शेजाऱयापाजाऱयांची आत्मीयतेने चौकशी करणे, गावात कुणी आजारी असल्याचे समजताच त्याच्या औषधपाण्याचे योग्य ते नियोजन होत आहे किंवा नाही याची जातीने चौकशी करणे असे घरचे व बाहेरचे मदतकार्य करण्यात त्यांचा दिवस संपून जात असे. गीताबाईंविषयी ग्रामस्थांना विलक्षण श्रद्धा आणि आत्मीयता होती. गावातील गरीबगुरीबांना दोन वेळचे जेवण व्यवस्थित मिळते अथवा नाही याकडे गीताबाईंचे लक्ष असे. बाळंतकरणींस योग्य तो खुराक, तूप, कपडे व औषधे पुरविण्याकडे त्या जातीने लक्ष पुरवीत असत. याबद्दल कुणी त्यांचे आभार मानावयास गेले असता त्या हसून सांगत असत, ‘अहो, मला काय कमी आहे? हे सारे काही मी चांगुलपणाने आणि कर्तव्यभावनेने करते, तेव्हा याबद्दल तुम्ही माझे आभार मानण्याऐवजी प्रतिदिन एक हजार वेळा ‘राम’नामाचा जप करण्याचा नियम करा, म्हणजे मला सर्वकाही मिळाले.’

दरम्यान, वार्धक्यामुळे लिंगोपंतांनी त्यांच्या कामकाजाचा भार रावजींच्या खांद्यावर सोपविला. रावजींनी कुलकर्णीपदाचे कार्य निगुतीने सांभाळले असले तरीही अंतर्यामी ते अध्यात्मावृत्तीतच गुंतलेले असत. नित्य पांडुरंगाचे अनुसंधान अन् विरक्तीच्या छटा यातून पुढे कधी ते बाहेर आले नाहीत, मात्र हाती आलेले काम सचोटीने व प्रामाणिकपणे करणे हा त्यांच्या स्वभावाचा नैसर्गिक कल कधी ढळला नाही. याच कारणांमुळे रावजी आणि गंगाबाई या दांपत्याविषयीचा ‘गोंदवलेकर’ ग्रामस्थांचा ओढा व प्रेम चढत्या क्रमाने वाढते झाले.

या पार्श्वभूमीवर, पुढे होऊ घातलेल्या अद्भुताची ‘नांदी’ ठरणाऱया दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पहिली घटना अशी की, एके रात्री लिंगोपंत यांना स्वप्नदृष्टांत घडला आणि त्यात खुद्द पंढरीराय विठ्ठल अवतीर्ण होत लिंगोपंतांस म्हणाला, ‘वयोमानाप्रमाणे पंढरीस पायी वारी करणे तुला यापुढे शक्य होणारे नाही तेव्हा मीच तुझ्या घरी राहावयास येणार आहे.’ असे सांगून शेतमळ्यातील एका विशिष्ट जागेकडे निर्देश करीत ‘येथे खणून पाहा म्हणजे मी सापडेन’ असे आश्वस्त केले. जागृतावस्थेत आलेले लिंगोपंत या स्वप्नदृष्टांतामुळे चांगलेच हरखून गेले आणि दिवस उजाडताच ते मजुरांसह सूचित केलेल्या जागेपाशी गेले. स्वप्नदृष्टांतानुसार त्या विशिष्ट जागेवर चार-पाच हात खोल खणून होताच ‘खण्ण’ असा आवाज आला तेव्हा लिंगोपंत स्वतःच खाली उतरले. आसपासची माती हाताने दूर करताच त्यांना तेथे श्रीविठ्ठल-रखुमाईची साजिरी-गोजिरी मूर्ती मिळाली. सर्वांनी ‘जय जय पांडुरंग हरी’ आणि ‘पुंडलिकावरदे हरी विठ्ठल’चा जयघोष केला. पुढे सुमुहूर्तावर लिंगोपंतांनी विठ्ठल-रखुमाईची स्थापना केली आणि सलग सात दिवस भजन, कीर्तन व अन्नदान केले. खणलेल्या जागेत पाणी लागल्याने ती जागा ‘विठोबाची विहीर’ म्हणून तर जेथे मूर्ती सापडली ती जागा आजही ‘विठोबाचा मळा’ म्हणून ओळखली जाते.

दुसरी महत्त्वपूर्ण घटना अशी की, गोंदवले येथून थोडय़ा अंतरावर बारा वर्षे मौन धारण केलेले ‘संभाजी’ नावाचे सत्पुरुष राहात होते. त्यांच्या दर्शनार्थ रावजी आणि गीताबाई गेले असता त्यांना संभाजीनाथांनी ‘प्रसाद’स्वरूपात श्रीफळ दिले आणि ‘परमात्मा तुमचे कल्याण करील, तुम्ही उभयतां परमात्म्याचे ‘नाम’स्मरण करा’ असा उपदेश केला. काही काळ गेल्यावर गीताबाईंना दिवस राहिले.

गीताबाईंच्या माहेरी श्रीरामाची उपासना आणि समर्थ रामदासांची भक्ती पूर्वापार चालत आली होती. त्यामुळे बालवयातच त्यांच्यावर दासबोधाचे वाचन आणि श्रीरामनामाचा जप करण्याचे ‘संस्कार’ घडले. श्रीसमर्थांना ‘गुरू’ मानणाऱया गीताबाईंना डोहाळे सुरू झाल्यावर सर्वत्र श्रीरामाचा भास होऊ लागला आणि मुखातून सतत ‘श्रीराम’नाम खेळू लागले. ही खऱया अर्थाने अद्भुताची नांदी होती.

(पूर्वार्ध)
[email protected]