
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभेच्या महासंग्रामात महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांतील 118 मतदारसंघांत 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव, जयाप्रदा, वरुण गांधी आदी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात तामीळनाडूतील वेल्लोर आणि त्रिपुरा पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द केली होती. त्या ठिकाणी या टप्प्यात मतदान होत असून गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उमेदवार म्हणून प्रत्यक्ष मैदानात उतरणारे भाजप अध्यक्ष अमित शहा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून नशीब अजमावत असून त्यांना किती मताधिक्य मिळते याची सर्वांना उत्सुकता आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघाबरोबर केरळमधील वायनाड येथूनही लढत देत आहेत. पहिल्यांदाच दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढणाऱ्या राहुल गांधी यांना केरळमधील जनता कशी साथ देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव, भाजप नेत्या जयाप्रदा, वरुण गांधी या टप्प्यात नशीब अजमावत आहेत.






















































