कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने नांदेडच्या सचखंड गुरुव्दारा बोर्डाची आर्थिक कसरत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडच्या सचखंड गुरुव्दारा बोर्डात गेल्या पाच वर्षात अतिरिक्त भरती तसेच हंगामी कर्मचारी वाढविल्यामुळे गुरुव्दारा सचखंड बोर्ड व्यवस्थापनावर अतिरिक्त भार पडत असून, कर्मचाऱ्यांना दिलेली बढती, हंगामी कर्मचाऱ्यांना व रोजंदारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार यामुळे 2014 च्या तुलनेत वेतन व मानधनाच्या रक्कमेत दुप्पटीने वाढ झाल्याने सचखंड गुरुव्दारा बोर्डाच्या प्रशासनावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. वास्तविक अशा कर्मचाऱ्यांची भरती गरजेची होती का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. जनमाहिती अधिकारात उघड झालेल्या या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेली. बोर्डाच्या प्रशासनाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक कसरत करावी लागत आहे.

श्री गुरुव्दारा तख्त सचखंड बोर्डाच्या अध्यक्षपदी भूपिंदरसिंघ मिनहास यांची नियुक्ती सरकारने केली. तत्पूर्वी भाजपाचे मुलुंडचे आ.तारासिंघ यांनी चार वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात म्हणजे जानेवारी 15 ते जानेवारी19 दरम्यान गुरुव्दारा बोर्डाकडून मनमानी पध्दतीने कर्मचारी, अधिकारी भरती व बढत्या करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार, देवेंद्रसिंघ मोटारवाले, सरदार वीरेद्रसिंघ बेदी व सरदार जसबीरसिंघ बुंगई यांनी नवनियुक्त अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले, की गुरुव्दारा बोर्डाने गेल्या चार वर्षात कसलीही जाहिरात न काढता, मनमानी पध्दतीने हंगामी व स्थायी कर्मचारी, अधिकाऱ्यांची भरती केली. तसेच जुन्या कर्मचाऱ्यांना बढती देवून त्यांची वेतनवाढही केली. त्यामुळे जानेवारी 15 मध्ये स्थायी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 571 होती तर त्यांच्या वेतनावर 97 लाख 19 हजार 793 रुपये खर्च करण्यात येत होते. तर मानधनावर 58 कर्मचारी तैनात असून त्यांच्या वेतनावर तीन लाख 36 हजार 822 रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्यासाठी एकूण एक कोटी 56 हजार 615 रुपये वेतनावर खर्च करण्यात येत असत. परंतू त्यानंतरच्या कालावधीत स्थायी कर्मचाऱ्यांची संख्या वाढून 780 एवढी झाली तर मानधन व रोजंदारीवर काम करणाNया कर्मचाऱ्यांची संख्या 361 झाली असून त्यांच्या वेतनावर 27 लाख 32 हजार 917 रुपये खर्च करण्यात आले. एकूण दोन कोटी नऊ लाख 31 हजार 63 रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्यामुळे वेतनावरील तिजोरीचा भार दुप्पट झाला आहे. अतिरिक्त कर्मचारी भरती करण्याची गरज होती का, बढत्या व वेतनावरील भार आवश्यक होता का? अशी विचारणा माहिती अधिकारात उपरोक्त कार्यकत्र्यांनी गुरुव्दारा बोर्डाच्या नवनियुक्त अध्यक्षांना विचारला आहे. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे