
सामना प्रतिनिधी। संगमनेर
राज्यात दुष्काळ भयानक आहे. मतदान झाल्यानंतर आम्ही दुष्काळग्रस्तांसाठी ताबडतोब कामे सुरू करणार म्हणजे करणारच. पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून ही कामे करणार आहोत. त्यामुळे निवडणूक आयोगालाही सांगतोय कृपा करून आचारसंहितेचा बडगा आम्हाला दाखवू नका. कारण माणुसकीची शिकवण देणाऱया साईबाबांना आम्ही दैवत मानतो. साईबाबांकडून आम्ही माणुसकी शिकलो आहोत. त्यामुळे माणुसकीच्या आड येणारी तुमची आचारसंहिता आम्ही मानणार नाही अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर उद्धव ठाकरे यांची विराट जाहीर सभा झाली. जलदिंडी घेऊन सदाशिव लोखंडे मुंबईला आले होते. याप्रश्नी मी तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांनीही यामध्ये लक्ष घातले. लोकांचे प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्यच आहे आणि मी ते प्रामाणिकपणे करतो असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिर्डी’ हे नाव या मतदारसंघाला मिळाले हे किती भाग्याचे आहे. साईबाबांचे आशीर्वाद ज्यांना मिळतात त्यांचे भाग्य उजळते. येथील पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गोरगरीबांना पाणी देण्यासाठी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते उलट फिरविणे का शक्य नाही? जर आपला देश नवनवीन विक्रम करत असेल तर ते शक्य आहे आणि हे काम आम्ही पूर्ण करणारच अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, नगर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार नरेंद्र दराडे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, आमदार बाळासाहेब मुरकुटे आदी उपस्थित होते.
हेच आमचे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व
मेहबुबा मुफ्ती बोलल्या, पाकिस्तानची शस्त्रास्त्र ईदसाठी ठेवलेली नाहीत. यावर उद्धव ठाकरे यांनी मेहबुबा मुफ्तींवर जोरदार हल्लाबोल केला. अहो बाई, तुम्ही पाकिस्तानात राहता की आमच्या हिंदुस्थानात? पाकिस्तानच्या प्रवक्त्या असल्यासारख्या मेहबुबा मुफ्ती बोलत आहेत. अशा औलादींना आपले सरकार धडा शिकविणारच असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. मी ठामपणे सांगतो, जो हा देश आपला मानतो तो मुसलमान जरी असला तरी तो आमचा भाऊ आहे. हेच आमचे हिंदुत्व आहे आणि हेच राष्ट्रीयत्व आहे असे उद्धव ठाकरे सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
काही करायला गेले की आचारसंहितेचा बडगा बसतो
महाराष्ट्रात दुष्काळ भयानक आहे. त्यामुळे मी सांगितले आहे की, मतदान झाल्यानंतर ताबडतोब दुष्काळग्रस्तांसाठी काम सुरू करायचे. अनेकदा प्रसारमाध्यमांत येते प्रचाराच्या मुद्दय़ांवरून दुष्काळ गायब. यामागे कारण आहे आचारसंहिता. काही करायला गेले की आचारसंहितेचा बडगा बसतो. पण निवडणूक आयोगाला सांगतो मतदान झाल्यानंतर कृपा करा. आचारसंहितेचा बडगा आम्हाला दाखवू नका. कारण माणुसकीची शिकवण दाखविणाऱया साईबाबांना आम्ही दैवत मानतो. त्यामुळे माणुसकीच्या आड आम्ही तुमची आचारसंहिता मानणार नाही. मतदान झाल्यानंतर दुष्काळासाठी आम्ही काम सुरू करणार म्हणजे करणारच. पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून सुद्धा काम करू अशा स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावले.
घोंगडी, काठी देऊन सत्कार…
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने घोंगडी, धनगरी पगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला. पांडुरंग दातीर यांच्यासह धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्ते यावेळी हजर होते. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या.

































































